पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुःखी झालं. गावात दारू बोकाळली. पोरीबाळींना, बायामाणसांना दिवस मावळल्यावर घराच्या बाहेर पडायची चोरी झाली. शेतात कामाला बिहारची, ओरिसातील दूरदूरची माणसं आली अन् बाई घरात कोंडली गेली. तिच्याकडे आता सगळ्या माणसांच्या रोट्या भाजायची वेळ आली. अडकित्याने कडबा कापायचं काम मोठं अवजड; पण ते यायचं बाईच्या वाट्याला. अडकित्याच्या ऐवजी चॉपकटर आला. ते यंत्र बटन दाबून चालू करायचं काम मात्र हाती घेतलं पुरुषांनी. बाजरगावी डोक्यावरती अवजड ओझं घेऊन कोस कोस चालत जायचं काम बाई करी. ट्रॅक्टर चालवत बाजारला जायचं सोपं काम हाती घेतलं मर्दानी.
 सतीच्या छळाचा हा कार्यक्रम अगदी महासती सीतेपासून सुरू आहे.

 सीतेचे स्वयंवर झाले. अयोध्येची महाराणी होण्याकरितां ती सासरी आली. कैकयीने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवायचं ठरवलं. तीसुद्धा सीतेला म्हणाली, "पोरी तुझ्या अंगावरची अजून हळद उरतली नाही. तू इथेच राजवाड्यात राहा." सीतेला वनवासात जाण्याची काही सक्ती नव्हती. पण तिचा ठाम निश्चय. जिथं राम तिथं सीता. वनवासात असताना रावणाने सीतेला पळवली हा काही तिचा दोष नाही. दोष ठेवायचाच तर तो रामावर आणि लक्ष्मणावरच ठेवायला पाहिजे त्यांना तिचं संरक्षण करता आले नाही म्हणून राम-रावण युद्ध झाले. वनवास संपला. राम, लक्ष्मण, सीता अयोध्येला परतले. रामाला राज्याभिषेक झाला. राम राजा झाला. सीता महाराणी झाली आणि एक दिवस रामाचे डोके फिरले. साक्षात अग्नीने सीतेला शुद्ध ठरवले पण रामाने तिला पुन्हा वनवासात पाठवले. सीतेला जवळ ठेवायचे किंवा नाही हा रामाचा निर्णय. त्याबद्दल आपण काय बोलायचे ? पण रामापाठोपाठ चौदा वर्षे अरण्यवासात काढणाऱ्या सीतेची रामाने काय वासलात लावली? त्याच्याने एवढेसुद्धा बोलवले नाही;"बाई, मी राजा आहे. माझ्या कर्तव्यामुळे मी तुला ठेवून घेणे शक्य नाही. एवढ्या वैभवशाली अयोध्येतल्या कोणत्याही महालात तू सुखाने राहा." बाळंतपण होईपर्यंत तरी अयोध्येत दोन खोल्या सीतेला देऊ करायच्या! तेवढाही मनाचा मोठेपणा पुरुषोत्तम रामाला दाखवता आला नाही. सीता वनवासात आली. यवतमाळ जिल्ह्यातल्या, राळेगाव तालुक्यातल्या रावेरी गावी थांबली. एका खोपटात लवकुशांचा जन्म झाला. बाळंतपणानंतर पथ्याकरता म्हणून सीता गावकऱ्यांकडे पसाभर गहू मागायला गेली. एक काळच्या महाराणी महासती सीतेला पदर पसरून भीक मागावी लागली. गावकऱ्यांनी तेवढी भीकसुद्धा घातली नाही. लोककथा सांगते, सीतेने गावकऱ्यांना तळतळून शाप दिला,

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १००