पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"तुमच्या गावात गहू म्हणून पिकणार नाही." रावेरी गावचे शेतकरी सांगतात परवा-परवापर्यंत म्हणजे संकरित गव्हाचे वाण येईपर्यंत गहू म्हणून त्या गावच्या वावरांत कधी पिकलाच नाही.
 अयोध्येत रामाच्या मंदिराचा आजकाल खूप गाजावाजा चालला आहे. रामाच्या मंदिराची काय घाई आहे ? गावोगाव रामाची छोटी मोठी देवळे आहेत. निराश्रित म्हणून हजारो वर्षे महासती सीता फिरते आहे. तिला आसरा केव्हा मिळणार आहे ? भूमिकन्या सीता निर्वासित झाली. आजच्या या मायबहिणींना आसरा देण्याचा 'लक्ष्मीमुक्ती' हा कार्यक्रम आहे.
 गेली दहा बारा वर्षे मी शेतीच्या उत्पादनखर्चाचा हिशेब देशभरच्या शेतकऱ्यांना शिकवतो आहे. समजावून सांगतो आहे. आज तुम्हाला मी एक नवीन उत्पादनखर्चाचा हिशेब सांगायला आलो आहे. शेतीत होणारे प्रत्येक काम आणि प्रत्येक खर्च टिपून ठेवा म्हणून मी तुम्हाला विनवले. आज एक नवीन विनंती करतो.
 एक दिवस भल्या पहाटे लवकर उठा; म्हणजे घरची लक्ष्मी उठायच्या आधी उठा. पेन्सिल घ्या आणि ती जे जे म्हणून काम करेल ते टिपायला लागा. चुलीचं, पोतेऱ्याचं, अंगणातलं, पोरांचं, जनावरांचं, रांधायचं, वाढायचं, उष्टी काढायचं, धुणी धुण्याचे, भांडी घासण्याचं, शेतातलं, सरपणाचं, गवऱ्याचं, जे जे काम ती करेल ती टिपून ठेवा. एवढं एक काम माझ्याकरता तुम्ही कराच. रात्री सगळी निजानीज होईपर्यंतची सगळी कामे लिहून ठेवा. पोरांना, सकाळी पावशेर दूध जास्त मिळावे म्हणून अर्ध्या रात्री उठून गुरांना ती चारा घातले तेही टिपून ठेवा.
 सांगा, तुमच्या घरच्या लक्ष्मीच्या दररोजच्या कामाचे तास किती होतात ? पंधरा तासात तर काहीच कमी नाही. आता या सगळ्या श्रमाचे मोल काय? प्रत्येक दिवशी दोन रोजाचे काम करते, त्याची रोजी काय धरायची? सगळी कामे ती ज्या प्रेमाने, आपुलकीने, ममतेने करते त्याची किंमत शून्य धरा. तुमची, पोराबाळाची, वडीलधाऱ्यांची आजारपणात ती जी सेवा करते त्याचीही किंमत शून्य धरा. पण रोजगार हमी योजनेच्या मातीच्या पाट्या टाकणाऱ्या बाईची किमान रोजी तर तुमच्या लक्ष्मीच्या नावे लावाल का नाही?

 एक दिवसाचा हिशेब झाला रुपये ३०. तिला सुट्टी कुठली? उलट, जगाचा सण म्हणजे तिला दुप्पट उस्तवार. समजा, तुमची लक्ष्मी हळदीच्या पावलाने तुमच्या घरात आली त्याला २० वर्षे झाली. मी २० वर्षाचा हिशेब करून दाखवतो. प्रत्येक भावाने आपापल्या घरचा हिशेब मनाशी करून पाहावा. २०

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १०१