पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चार प्रास्ताविक शब्द.


 प्रस्तुत पुस्तकाला चार प्रास्ताविक शब्द आम्ही लिहावे अशी प्रकाशकांनी इच्छा प्रदर्शित केली. हे पुस्तक लिहिणाऱ्या श्रीमति काशीताई कानिटकर व त्यांचे प्रिय पति कै. गोविंदरावजी कानिटकर या उभयतांशी असणारा आमचा ऋणानुबंध व स्नेहसंबंध मनांत येऊन प्रकाशकांच मान्य करणें प्राप्त झालें. 'सर्वः सगन्धेषु विश्वसिति' या न्यायाने श्रीमति रमाबाईसाहेब रानडे, सौ. कमलाबाईसाहेब किबे, सौ. काशीबाई हेरलेकर यांच्यासारख्यांच्या हातून हे काम व्हावयाला पाहिजे होतें. तसा योग आला असता तर तो खरोखर विशेष अभिनंदनीय झाला असता.
 'चांदण्यांतील गप्पा' या प्रस्तुत पुस्तकावर चार शब्द लिहिण्यापूर्वी त्या गोष्टी ज्यांच्या लेखणीतून उतरल्या त्यांच्याविषयींची थोडी माहिती वाचकांस देणें अवश्य आहे. गेल्या पन्नास वर्षांत स्त्रीशिक्षणाच्या तीन स्थूल अवस्था दृष्टीस पडतात. पहिलींत बहुजनसमाजाचा स्त्रीशिक्षणाशी तीव्र विरोध दिसून येतो; दुसरींत विरोधाचे स्थान सहिष्णुतेनें पटकाविलेले आढळते; तिसरीत सहिष्णुतेच्या जागी आवड व आवश्यकता या अधिष्ठित झाल्या आहेत. स्त्रीशिक्षण असा शब्दप्रयोग आम्हीं वर केला आहे, तो अलीकडील प्रचलित अर्थावरून केला आहे. हा प्रयोग अगदीं नवीन आहे. वस्तुतः असला प्रयोग अस्तित्वांत यावयाला नको होता. कारण शिक्षण ही वस्तु सदैव चांगलीच असून ती पुरुषांना तशीच स्त्रियांनाही हितकर व अभ्युदयावह आहे. लिंग, जाति, धर्म, वय इत्यादिकांवरून शिक्षणाचे प्रकार कल्पूं लागल्यास ते अनंत होणार आहेत; व त्यांचा तादृश उपयोगही नाहीं. प्रचलित स्त्री-शिक्षणविषयक विचारांत पुष्कळ वैचित्र्य आहे. त्यांची एकवाक्यता होण्याचा सध्यां तरी रंग दिसत नाहीं. या विषयासंबंधानें आमचे मत थोडक्यांत असें आहे. स्त्रियांना उत्कृष्ट स्त्रिया बनविणें व पुरुषांना उत्कृष्ट पुरुष तयार करणें हें राष्ट्रीय शिक्षणाचें मुख्य ध्येय असावें. स्त्रियांना