पान:गोमंतक परिचय.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. प्रकरण आठवें. प्रेक्षणीय स्थळे. सृष्टिसौंदर्याचा ठेवाः--आम्हां गोमंतकीयांना हा ठेवा अतिपरिचयामुळे असूनही नाहींसाच झाला आहे. जन्मापासूनच हा प्रांत पाहत आल्याने, त्यांत कांहीं विशेष आहे ही जाणीवच गोमंतकीयांत नसते म्हटले तरी चालेल. गोव्याबाहेर प्रवास करावा, इतर प्रदेशांत वास्तव्य करावे, तेव्हांच सापेक्षतेने गोव्याचे सौंदर्य मनास पटते अशी आम्हां गोमंतकीयांची तरी स्थिति आहे. तीरावरील वृक्षराजीने नजर केलेली छत्र चामरादि राजचिन्हें धारण करून आजूबाजूच्या हिरव्यागार शेतांतून रौप्य मेखलेप्रमाणे शोभणाऱ्या व दुथडी भरून चालणाऱ्या अशा आमच्या नद्या; व्यवस्थित चौरसांमुळे एकाद्या विस्तीर्ण पटासारखी दिसखारी हिरवी पिवळी शेते; त्यांतूनच मधून मधून विखुरलेल्या व बुद्धिबळाच्या मोहोऱ्यांप्रमाणे शोभणाऱ्या लहान मोठ्या लवणगिरीचे व गवताच्या गंजींचे तांडे; पश्चिमेकडे सायंकाळी हिंदी महासागरांतून मांगल्याची दर्शक अशी आरक्तवर्ण छटा देणाऱ्या सवित्याची ती सुंदर प्रतिमा; पूर्वेकडे आमच्या रक्षणार्थ एकाद्या भिंतीप्रमाणे खडा असलेला, नेहमी नीलवर्ण शोभणारा आमचा प्रिय सह्याद्रि; आणि त्यांतूनच मधून मधून झुळझुळणाऱ्या प्रवाहांनी डोळे आणि पोट यांना मनमुराद खुराक देत असलेला जीवन रस; चोहोकडे चंवांप्रमाणे दिसणारे व आमूलाग्र उपयुक्ततेने थबथबलेले नारीकेळ रूपी कल्पवृक्ष; इतस्ततः विखुरलेली व मधून मधून डोके उंच करून जणुं पहारा करीत असलेली आमची देवालये; इत्यादि सौंदर्याभरणे ज्या भूमीनें लेइली आहेत अशी, आजन्म तारुण्यांतच विहरणारी, ही आमची प्रिय मातृभूमि आहे. गोमंतकीय म्हटला म्हणजे तो रसिक, भावनाप्रधान, कलाप्रवण व सौंदर्यग्राही असतो, याचे कारण झाले तरी त्याच्या भोवताली असलेल्या या परिस्थितीतच असावें. गोमंतकीय सृष्टिसौंदर्याचे यथायोग्य वर्णन करायला आमची गद्यलेखणी असमर्थ आहे. एकाद्या कवीने किंवा कादंबरीकारानेच ते केले तर करावे. उत्तरेस काठेवाडपर्यंत, दक्षिणेस कोची, पूर्वेस हुबळी, धारवाड, पर्यंत लेखकाने प्रवास केला आहे. या एवढ्या प्रवासांत गोव्याशी स्पर्धा करू शकणारे सृष्टिसौंदर्य त्याला तरी इतरत्र दिसले नाही. .