पान:गोमंतक परिचय.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय व शास्त्रीय विषयाच्या अभ्यासास दोन वर्षे लागत. याखेरीज अर्थशास्त्र व राज्यपद्धीचे ज्ञान यांचा एक वर्ग आणि मराठी भाषेचा दुसरा वर्ग, हे स्वतंत्र असत. परंतु लिसेवच्या शिक्षणक्रमाच्या पूर्णतेस हे उभय वर्गही आवश्यक होते. दुय्यम शिक्षकाची जागा मिळावयाला, सरकारी नोकऱ्यांतील ऑफीसरच्या जागांनां व सनदी वकिलीच्या परिक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना हा शिक्षणक्रम आवश्यक समजला जाई. मडगांव व म्हापशे येथील शाळा कायम राखून त्या रायतुरच्या सेमिनारीस जोडण्यांत आल्या व फ्रेंच व इंग्रजीच्या शाळा लिसेवला जोडण्यांत आल्या. आधुनिक सुधारणाः--इ. स. १८९४ त पोर्तुगालांतच दुय्यम शिक्षणाची व्यवस्था आमूलाग्र बदलण्यांत आली. आजवर प्रत्येक विषय स्वतंत्रपणे शिकून, विषयवारी प्रमाणे वाटलेला अभ्यासक्रम पुरा करण्याऐवजी, यापुढे प्रत्येक विषयाची वाटणीच अभ्यासक्रमाच्या वर्षांतून व्यवस्थित केली गेली. लिसेव नासियोनालचा अभ्यासक्रम पांच वर्षांतून विभागला गेला. इ. स. १८९७ च्या जानेवारीत ही सुधारणा इकडे लागू झाली व त्याच वर्षांच्या जून महिन्यांत त्याप्रमाणे वर्गही चालू झाले. अभ्यासक्रमांत पुढील फेरफार होऊन शिक्षणाचा मगदूर कमी झालाः १ पोर्तुगीज भाषा व वाङ्मय, २ ल्याटिन भाषा, ३ फ्रेंच भाषा, ४ इंग्रजी भाषा, भूगोल व इतिहास ५ विशेषतः पोर्तुगालचा भूगोलेतिहास, ६ अंकगणीत, बीजगणिताची मूलतत्वे व साधी भूमिति, ७ सृष्टिशास्त्र पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांची मूलतत्वें व ८ चित्रकला. पांच वर्षांच्या या कोसाला सामान्य कोर्स (Curso Geral) असें नांव होते. शिवाय तत्वज्ञानाचा वर्ग, अर्थशास्त्र व राजनीतिशास्त्र याचा वर्ग आणि मराठी भाषेचा वर्ग, इतकें शिक्षण होतांच लिसेवचा कोर्स पूर्ण होई. पूर्वीच्या शिक्षणक्रमापेक्षां यांत बीजगणीत, घनभूमिति ( Geometria no espaco) व त्रिकोणमिति रसायनशास्त्र व पदार्थविज्ञानशास्त्र यांची खच्ची झाली होती व तत्वज्ञानाचा वर्ग स्वतंत्र करण्यांत आला होता. परंतु याशिवाय शिक्षणाचा मगदूर कमी व्हायला जुन्या पद्धतीच्या शिक्षकांचा नव्या पद्धतीशी अनभ्यस्तपणा देखील बराच कारणीभूत झाला. त्याचप्रमाणे ह्या कामी आवश्यक असलेली शिक्षणसामुग्री देखील लिसेवांत आणली गेली नव्हती. इतर विषयांबरोबर वाटला गेलेला आपापला विषय शिकवितांना जुन्या शिक्षकांना बरेंच अवघडल्यासारखे होई.