पान:गांव-गाडा.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४      गांव-गाडा.


ऐन-जिनसी परभारा हक्क असत. इनाम जमिनी बिन धान्याने किंवा कमी धाऱ्याने चालत; आणि नक्त नेमणुका गांवच्या ऐन जमेवर बसविल्या असून त्या सरकार वसूल करी आणि आपल्या खजिन्यांतून नेमणूकदारांना खर्ची घालून आदा करी. पूर्वी दाम-दुकाळ होता. सरकारसुद्धा आपलें येणें रयतेकडून धान्याच्या रूपाने घेई. मेहनताना किंवा हक्क चुकविणे रयतेला सोपे जावें म्हणून वतन-पद्धतींत सर्व सरकारी खासगी देणे ऐन जिनसी देण्याचा प्रघात पडला. सोयीप्रमाणे ऐन जिनसी हक्क रयत कधी कधीं रोकडीनेही आदा करी. ज्याप्रमाणे वतनदार कामदार कुणब्यांकडून काळीवर सळई, पेंढी, घुगरी किंवा बलुतें घेत त्याप्रमाणे ते पांढरीमध्ये हुन्नरदार, दुकानदार यांजकडून कसबवेरो, शेव, फसकी, वर्तळा घेत. पांढरी-हक्कांना मोहतर्फा म्हणतात. पाटीलकुळकर्ण्यांच्या मानाने देशमुख-देशपांड्याचे इनाम, हक्क व मानपान पुष्कळ अधिक असत. देशमुख-देशपांड्यांच्या हक्कांना 'रुसुम' व 'भिकणे' म्हणत. गांवमुकादमांत पाटीलकुळकर्णी अधिकाराने व मानाने सर्वात श्रेष्ठ होत. देशमुखाला परगण्याच्या एकंदर वसुलाचा व लावणीचा विसावा हिस्सा व देशपांड्याला चाळिसावा हिस्सा, आणि पाटीलकुळकर्ण्यांना गांवच्या राशीचा दहावा हिस्सा मिळे, असा अंदाज आहे. कुळकर्ण्यांच्या बाबती पाटलाच्या निमानिम होत्या; आणि दोघांना गांवापुरते देशमुख-देशपांड्यांप्रमाणे सर्व-पण कमी प्रमाणांत-बाबती, हक्क, व अम्मल मिळत. मामूलप्रमाणे महारांना गांवकी घरकीबद्दल नांगरामागें आठ पाचुंदे बलुतें मिळे; बाकीच्या पहिल्या ओळीच्या कारूंना चार, दुसरीच्यांना तीन व तिसरीच्यांना दोन पाचुंदे याप्रमाणे बलुते मिळे. स्थलपरत्वे निरनिराळ्या परगण्यांत किंवा एकाच परगण्यांतील निरनिराळ्या गांवांत बलुत्याचे निरनिराळे निरख होते हे सांगणे नकोच. देशमुख-देशपांड्ये, व पाटीलकुळकर्णी ह्यांच्या बाबती व अंमल काय होते याजबद्दलची टिपणे या प्रकरणाच्या शेवटी दिली आहेत.

 गांवगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडींत होतो. कचेरीला सर-