पान:गांव-गाडा.pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८      गांव-गाडा.


पाण्याचा अंदाज, गुन्ह्याचा तलास, गांवासंबंधी सरकारी खासगी व्यवहार वगैरे गोष्टींत ते चांगले वाकबगार असत. परंतु त्यांना लिहिण्याचे अंग अगदी जुजबीं, बहुतेक नव्हते म्हटले तरी चालेल.

 पाटील स्मरणाचा कितीही धड झाला तरी वर नमूद केलेली त्याची गांवकीची कामें लिहिण्यावांचून चोख होणे कठीण. सबब त्याला लेखक मदतनीस अवश्य झाला. ह्या मदतनिसाला स्थलपरत्वें पटवारी, कुलकर्णी किंवा पांड्या म्हणतात. ' नांव लिहिणे' हा एक पूर्वी जमेदारी हक्क होता. पट म्हणजे इजारपट ( गांवचा मुख्य हिशेबी कागद) करणारा तो पटवारी, किंवा कुळे करणारा म्हणजे कुळवार गांवचा हिशेब लिहिणारा तो कुलकर्णी. हा शब्द बहुधा दक्षिण हिंदुस्थानांतून उत्तरेकडे आला असावा, कारण द्राविडी भाषेत शेतकऱ्याला “कुल" व कुळकर्ण्याला "करणं" म्हणतात. पांड्या हा पंडित शब्दाचा अपभ्रंश आहे. कुळकर्णी हा पाटलाचा हिशेबनीस होय. कुळकरणवतन समारें हजार वर्षांचे जुनें आहे असें सांगतात. बहुतेक कुळकर्णी ब्राह्मण, कांहीं प्रभु व क्वचित् मराठे, लिंगायत, व मुसलमान आहेत. पाटिलकीच्या खालोखाल कुळकरणाला महत्व असे, आणि पेशव्यांपासून तो खालपर्यंत सर्व ब्राह्मण सरदार त्याला बिलगले. सोनपतपानपत खेटलेल्या अंताजी माणकेश्वरानें राशीनच्या देवीच्या देवळाभोंवतीं ओवऱ्या बांधल्या; त्यांच्या शिलालेखांत सरदारी, जहागिरदारी वगैरेंचा उल्लेख न करतां "कुळकर्णी कामरगाव" इतकेंच उपपद त्याने आपल्या नांवापुढें लाविले आहे. ही गोष्ट कुळकर्ण्यांचा सामाजिक दर्जा उत्कृष्ट रीतीने दाखविते. कुळकर्णी गाव दप्तरचे सर्व काम करी. शिवाराचें कमाल क्षेत्र, आकार व वर्णन ह्यांचा आकारबंद, शेतवारपत्रक, लावणीपत्रक, पडपत्रक, सरकारी देण्याचे असामीवार वसूलबाकीपत्रक व त्याची बाबवार फाळणी आणि जमाखर्च, गुरांची व माणसांची गणति वगैरे मुलकी कागदपत्र; दिवाणी कामांतील पंचायतीचे सारांश व फैसलनामे, फौजदारी कामाचे कागद वगैरे लेखी कामें