पान:गांव-गाडा.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८      गांव-गाडा.


राहण्याला मुख्य आमिष काय तें सर्वमान्य इनामी वतन होऊन बसलें त्याचा लोभ कोणालाही सुटेना. उपट पाल आणि पुढच्या गांवाला चाल, अशा रीतीनें गांवोगांव रोजगारासाठी भटकण्यापेक्षा एखाद्या गांवीं स्थाईक होऊन गिऱ्हाईक बांधून टाकावे, म्हणजे मला काम मिळतें कां दुसऱ्याला मिळतें म्हणून वाट पहात बसण्याची गरज उरणार नाही, आणि पोटापाण्याची चिंता निरंतरची दूर होईल, ह्या विचाराने जातकसब्यांनी गांवकी वतनावर उडी घातली. सबब गांवकीतले नुसते राजाधिकारी व धर्माधिकारीच वतनदार होऊन बसले नाहीत, तर राजाच्या असाम्यांप्रमाणे कारूनारूही गांवचे वतनदार चाकर झाले. परंतु गांवगाड्याच्या उभारणीला व बळकटीला सर्वांत जास्त मदत देशांतील बेबंदशाहीची झाली. आतांप्रमाणे एकछत्री, सुयंत्रित, दक्ष व सक्त राज्यव्यवस्था नसल्यामुळे रयतेकडील करभार निश्चित रकमेनें निश्चित काळी सरकारचे पदरांत पडणे मुष्कील होते. सरकाराला परचक्राची भीति तर होतीच, पण देशांतले देशांतही शत्रुभय पुष्कळ असे. संस्थानिक, सरदार, इनामदार, ह्यांमध्ये राजसत्तेची विभागणी इतकी झाली होती की, मध्यवर्ती सरकाराचा दाब राजधानीबाहेर क्वचित् भासत असे; आणि राज्यांतील मुलूख व लोक ह्यांचे संपूर्ण व पद्धतशीर नियंत्रण राजाच्या आवाक्याबाहेर गेले होते. हिंदुस्थानांत ही स्थिति केव्हांपासून सुरू झाली हे जरी निश्चयाने सांगता येत नाही तरी ती मुसलमानी रियासतीच्या पूर्वीपासून होती ह्यांत संशय नाही. राजांनाही असेंच झाले होते की, राजकीय, धार्मिक व सामाजिक बाबतींत जातीचा भार जितकी जात उचलील व गांवचा भार जितका गांव उचलील तितकें बरें. ह्यामुळे गांवगाडा एक सवता सुभाच होऊन बसला,आणि त्यांतली सर्व कामें व कारभार हा इनामदार अगर वतनदार ह्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालू राहिली.

 जसजशा राज्याच्या, समाजाच्या आणि गांवकीच्या गरजा वाढत गल्या, तसतसे इनाम देण्याचे हेतु व त्यांचे प्रकारही वाढत गेले. मुख्य इनाम देणारे दोन-राव आणि गांव. भूमीचे स्वामी राजे होते, तरी त्यांनी