पान:गांव-गाडा.pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२      गांव-गाडा.


आणणारा, गोळा करणारा; असे चौगुला व चौधरी ह्यांचे मूळ अर्थ असावेत. चौगुल्याला चौ-लगो असेंही म्हणतात. पूर्व खानदेशांत चोपडे म्हणून तालुक्याचे ठिकाण आहे. तेथील लोक सांगतात की, चोपडे म्हणजे चौपाड, चोहोंकडून पहाड, चारी बाजूला डोंगर; किंवा चौ-पाडा म्हणजे अनेक वाड्या असलेला गांव. रा.भारदे म्हणतात की, चौगुला हा शब्द चौकुल ह्या शब्दापासून निघाला. असो. पाटलाप्रमाणे चौगुला व इतर जातकामगार ह्यांची नेमणूक पहिल्या पहिल्याने लोकनियुक्त असावी. पुढे जसजसे संख्येने लोक वाढत गेले व दूरदूर पांगत गेले, तसतसे त्यांचे एकमेकांतील दळणवळण कमी होत जाऊन जात कामगारांची निवड करणे कठीण पडत गेलें. कामगारांच्या पूर्वजांनी बजाविलेल्या कामगिरीबद्दल कृतज्ञता. त्यांच्या घरंदाजीबद्दल आदर, 'शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी' निपजतातच अशा श्रद्धा, आणि नवीनाबद्दल दचका व त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात कामांतील घोंटाळा व त्रास इत्यादि भावनांमुळे जातकामगार निरंतरचे करून टाकावेत असे लोकांना वाटले असावे; आणि त्यांना जातकामगारांच्या कुळ्या ठरविल्या असाव्या. राजाच्या मागे त्याचा मुलगा सिंहसनावर बसतो हा न्याय सर्वांच्या डोळ्यासमोर होताच. राजाधिकाराप्रमाणे सर्व प्रकारचे अधिकार व कामें वंशपरंपरेने चालवावींंत हा मार्ग लोकांना राजमार्ग वाटला आणि जातकामगार वतनदार होऊन बसले.

 जातपाटलांची मुख्य कामें म्हटलीं म्हणजे जातीच्या वतीने इतराशी बोलणेंं करणे, जातपंचाईत बोलावणे, आणि तिच्यांत पुढाकार घेऊन जातीचे तंटे निवडणे व अपराध्यास शासन करणे हीं होत. पंचांपुढे येणाऱ्या बखेड्यांत 'नाटल्याबाटल्यांच्या' खटल्यांची संख्या सर्वांत जास्त असते; याचे कारण जातिभेद होय. अप्रबुद्ध लोक एकमेकांचा दावा बहुशः घराला किंवा वळ्हईला आग लावून साधतात. कुरापतीचे दुसरे प्रमुख कारण एकाने दुसऱ्याची बायको काढून नेणेंं