पान:गांव-गाडा.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति      ३३


किंवा विधवा अगर कुमारिका गरोदर होणे हे होय. ह्यांनाच लोक 'जळीपळीची' भांडणे म्हणतात. जातपंचायतींत ह्याही फिर्यादी पुष्कळ असतात. ह्यांखेरीज जातप्रकरणाचे आणखी दावे ह्मटले म्हणजे लग्नमोहतरांत नवरीच्या बापाने जातीच्या ठरावापेक्षा अधिक पैसा घेणे, बायको न नांदविणे, सोयरिकीचे बखेडे, जातीला अनेगा आहे असे कृत्य करणे, ( जसें, गरती कोल्हाटणीने कुंकू लावणे, जोडवीं, बुगड्या, नथ घालणे; वड्डरणींंने किंवा गोंडणीने चोळी, नथ, बांगड्या घालणे; फांसपारध्यांमधील गाईवरून शिकार करणाऱ्या पोटजातीतल्या लोकांनी जोडा घालणे) वगैरे होत. पाटील दैवाच्या (जातीच्या) सल्ल्याने त्यांचाही इन्साफ करतो. गुन्हेगार जातींत एकमेकांच्या दगलबाजीबद्दलचा न्याय अद्यापि जातीमार्फत होतो. त्याला प्रमाण, इमान किंवा दिव्य म्हणतात. आपल्या साथीदाराला चोरून जर एखाद्या भामट्याने चोरीचा माल बळकावला असा संशय आला तर जात त्याला 'तेल-रवा' किंवा 'तेल-गोटी ' चे प्रमाण करावयास लावते. तें असें की, कढईत तेल कढवितात व ज्यावर तोहमत असेल त्याला त्या कडकडीत तेलांतून आंगठी, रवा, गोटी किंवा पैसा हाताने काढावयास सांगतात. तेलाने जर त्याचा हात भाजला नाही तर तो निर्दोषी आहे असें समजतात. लंगोटीपारधी नदीत बुडी घेण्याचे किंवा तापलेली कुऱ्हाड घेऊन चालण्याचे प्रमाण करतात. व्यभिचार केला नाही ह्याचे इमान कढत तेलांतली आंगठी किंवा पैसा काढून घेऊन फांसेपारधिणीला दर दसऱ्याला आपले नवऱ्याला करून दाखवावे लागते. उपनिषदकालापासून आमच्या लोकांची प्रमाणावर श्रद्धा आहे असे दिसतें. छांदोग्योपनिषदांत १६ वे खंडांत उद्दालक आरुणी आपल्या श्वेतकेतुनामक पुत्राला सांगतो की, चोरी न करणाराचा हात तप्त परशूनें भाजत नाही, कारण त्याच्या आत्म्याला सत्याचे आवरण असते. सीतेची अग्निशुद्धि पुराणप्रसिद्ध आहे. असो. चौगुला हा जातपाटलाचा तैनाती किंवा हुजऱ्या होय. पाटील किंवा त्याचा मंत्री ह्यांचे सांगण्यावरून