पान:गांव-गाडा.pdf/295

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७२      गांव-गाडा.

व्यवहारी अपूर्णांक, क्षेत्रमापन, व्याज, काळ-काम-वेग वगैरेंची साधीं उदाहरणे, आणि बेताची चित्रकला हे विषय मेहनतीने शिकविले पाहिजेत; म्हणजे आज बहुतेक तात्यापंतोजीच्या शिक्षणक्रमावर भागेल. ह्याशिवाय व्यापार, प्रांतापुरती राज्यव्यवस्था, इतिहास, सृष्टिसौंदर्य ह्यांच्या अनुरोधानें इलाख्याचा भूगोल विद्यार्थ्यांचे हातांत पुस्तक न देतां नकाशावरून शिकवावा; आणि हिंदुस्थानचा भूगोलही व्यापारी बातम्या व वर्तमानपत्रे समजण्याइतका नकाशावरून शिकवावा. इतिहास शिक्षकानें वाचून अगर व्याख्यान-रूपाने शिकवावा. चित्रे व नकाशे काढण्याचे तांत्रिक ज्ञानही मुलांना मिळाले पाहिजे. ह्यांखेरीज सर्वसामान्य ज्ञानावरील पाठ शिक्षकांनी मुलांना वाचून दाखवावेत, आणि दर्शनी ज्ञानाने म्हणजे शक्य तितक्या वस्तु व प्रयोग दाखवून प्रत्यक्ष ज्ञान देण्याची खबरदारी बाळगली पाहिजे. सामान्य ज्ञानाचे शिक्षण जितके जास्त मिळेल तितका आमचा हास्यास्पद देवभोळेपणा नाहीसा होईल. दुष्काळ, प्लेग, पटकी वगैरेंचे सुद्धा आदिकारण देवापेक्षा नैसर्गिक नियमांकडे जास्त येते, ह्या व असल्या गोष्टी लोकांना कळू लागल्या तर भोंदूंचे बंड कमी होऊन जनता योग्य मार्गाने जाईल. सर्वसामान्य ज्ञान ह्या विषयामध्ये माणसा-जनावरांचे आरोग्यशास्त्र, शारीरशास्त्र, हवा, पाणी, स्वच्छता, वनस्पतिशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, खगोल, पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, वगैरेंच्या रोजच्या व्यवहारांत लागणाऱ्या शास्त्रीय माहितीचे सोपे पाठ असावेत. तसेंच शेतकी व तिला जरूर अशी दुसरी माहिती ह्यांचाही त्यांत अंतर्भाव व्हावा. या ज्ञानाचा मुख्य हेतु हा की, पदार्थ अगर वस्तुस्थिति पाहून तिच्यामध्ये सुधारणा करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्याच्या आंगी यावें. उदाहरणार्थ, बीं गोमूत्रांत का भिजवितात, कोयत्याचे पातें अगर कुऱ्हाडीचा दांडा लांब किंवा आंखूड कां असावा, मोटेला कणा कशाला पाहिजे, गाड्यांची चाक उंच किंवा ठेंगणी असावीत की काय, इत्यादि ज्या गोष्टी लोक पाहतात व करतात, त्या सुधारण्याबद्दलचे विचार व प्रयोग करण्याची पात्रता