पान:गांव-गाडा.pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २७१

वेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारे किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा, आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तऱ्हा होते. त्यामुळे त्यांतली वर्मे एकमेकांच्या ध्यानात येत नाहीत व सर्वच आउतें अगदी निकृष्ट अवस्थेप्रत पोचली आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेंत शिकविले तर हत्यारे एकाच्या देखरेखीखाली तयार होऊन ती सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बसून त्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल. जोडा कोठे लागतो हे वापरणाराला तेव्हांच कळते. ह्या न्यायानें आउतें वापरणाऱ्या कुणब्याला जर त्यांतली नजर आली तर तो त्यांतले दोष काढून टाकण्यासाठी शक्य तितके प्रयोग करून पाहील, आणि सुधारलेली हत्यारे तयार करील. जातिबाह्य धंद्यांचे शिक्षण सर्व जातींच्या मुलांना सर्रास प्राथमिक शाळांतून मिळू लागले तर जातिधर्माची अथवा जातधंद्याची कांटेरी कुपाटी नाहीशी होईल, हा सर्वात मोठा फायदा आहे.

 खेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हां कुणबी हा खेड्यांतला प्रधान घटक आणि कुणब्यासाठी इतर हे नाते लक्षात आणून खेड्याखेड्यांनी शाळा काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे तास व सुट्या असाव्यात, शेतकाम नसेल अशा दिवसांत शाळा दुवक्त असावी, तें बेताचे असेल त्या वेळी एकवक्त, आणि त्याचा भर असेल त्या वेळी विद्यार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या बेताने म्हणजे सुमारे एक दोन तास शाळा भरवावी. शाळेंत शारीरिक बलवृद्धीला महत्त्व दिलं पाहिजें; आणि अभ्यासक्रम इतकाच असावा की, शिकणाराला बाजारांत अडचण पडूं नये, सावकाराशी तोंड देतां यावे आणि आपल्या धंद्याचे ज्ञान वाढवतां यावे; म्हणजे व्यवहार्य व प्रोद्दीपक शिक्षणाची तरतूद केली पाहिजें. लिहितां वाचतां येणे, पाहिलेली व ऐकलेली वस्तु व हकीगत मजकूर जुळवून सांगतां व लिहितां येणे, उजळणी, देशी चालीची कोष्टकें, (ज्याला परदेशी कोष्टकांचे कारण पडेल ती तो जरुरीप्रमाणे पुढे शिकेल. ) तोंडचे हिशेब, जमाखर्च, पंचराशिक,