पान:गांव-गाडा.pdf/268

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २४७

घर, गांव किंवा जात एकदिलाने धर्म ह्मणून दुराचार करणारी निघणे ह्यांत महदंतर आहे. पहिली स्थिति वैयक्तिक असून ती सुधारण्याला राजशासन किंवा समाजशासन उपयोगी पडते. परंतु दुसरी समाजधर्म बनून बिनतोड होते, व ती सुधारण्यास कशाचाही उपयोग होत नाही. बहुजनसमाजाचे अवगुणांना अवगुण समजत नाहीत, ते गुणांच्या व्यासपीठावर जाऊन बसतात. जेथें दुराचरणाला समाजाची अनुकूलता आहे, तेथें राजशासन फिक्के व लुले पडते. ही झाली ज्या त्या जातीची अवस्था. भामट्यांना चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यास्तव सोनार सराफ पाहिजे, आणि कसबी जातींचा व्यभिचार सर्व जातींशी चालतो. अशा प्रकारे ह्या जातींच्या अनीतीत इतर जाती सतत व उघड उघड पडतात आणि त्या निर्लेप सोवळ्या न राहता त्यांतल्या हजारों व्यक्ती धूमधडाका दुराचारी निघतात. शेजारच्या वाईट जागेतली दूषित हवा जर आपल्या घरांत व पोटांत शिरते तर हरवक्त संबंध येणाऱ्या व्यभिचारी व गुन्हेगार जातींचे गुणावगुण इतर संबंधी समाजांना थोडे फार पछाडल्याशिवाय कसे राहतील ? जातिभेदाचा तट ओलांडून ते परजातीता घुसणार नाहीत, असे मानणे समाजशास्त्रज्ञांच्या अनुभवाविरुद्ध आहे. हिंदुस्थानांत गुन्हेगार जातींची लोकसंख्या अजमासे ५० लक्ष आणि भिकार जाती व पंथ ह्यांची लोकसंख्या ५२ लक्ष आहे. ह्या जमाती पराकाष्ठेच्या चलाख,कल्पक,धाडसी चिकाटीच्या व श्रमसहिष्णु आहेत. इतक्या लोकांच्या

-----

 १ 'कारकुनी' ह्या लांचेच्या समानार्थक शब्दावरून हा दुर्गुण कारकुनी पेशा बाहेर गेला नसावा असे वाटेल पण भिक्षुकीप्रमाणे तोही सर्व जातीत कसा पांगला तें पहाः दुष्काळी कामावरील फैलांवरचे मुकादम झाडून मागासलेल्या जातीतले असून त्यांत शेकडा नव्याण्णवांना सहीसुद्धां करता येत नव्हती. तरी सर्व जातींच्या मजूर बायका उभ्या रस्त्याने दिमाखनें त्यांना मेळ्यानें गाणे गात की:
   सांगून धाडतें चाट्याला । नखीचें धोतर माझ्या मुकादमाला ॥
  सांगून धाडतें कलालाला । दारूची बाटली माझ्या मुकादमाला ॥ इत्यादि.