पान:गांव-गाडा.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४८      गांव-गाडा.

असल्या गुणांचा समाजाला उपयोग होऊ नये ह्यापरतें ह्या जातींवर, त्यांतील लोकांवर व आमच्या एकंदर समाजावर दुर्दैव ते कोणते ओढवणार !!!

 पूर्वीच्या राजवटींत जातिजातींची व गांवकीची बंधने फार कडक असल्यामुळे आणि कायद्यांचा इतका कीस काढीत नसल्यामुळे जातिजातींच्या उपद्व्यापांवर एकंदर जनतेचा बराच सक्त दाब असे. व्यभिचारी जातींनी घरंदाज कुटुंबांतली बाई काढून नेली तर वेळेला गांवकरी सबंध जातीला ठोकून काढावयाचे, त्यांची पालें जाळावयाचे, व पुनः त्यांना गांवांत पाऊल घालूं द्यावयाचे नाहीत. 'मारक्या म्हशीच्या माथां घाव', ह्या न्यायाने गांवमुकादमानीत वहिमी दरोडेखोरांना सुळावर चढविण्यांत पुराव्याची कमतरता आड येत नसे. म्हणून सर्व गुन्हेगारांना अलोट जरब असे. गुन्हेगार व व्यभिचारी जाती पुष्कळ ठिकाणी वतनदार होत्या. दळणवळण जुजबी असल्यामुळे सर्वच समाजांत एकमेकांना एकमेकांची मुरवत असे, अपराध दडविण्यास सवड नसे, आणि गुन्ह्यांचा बोभाटा तेव्हांच होई. पूर्वी खर्चाच्या व चैनीच्या बाबीही थोड्या असत, व मादक पदार्थांची आतांप्रमाणे बंदी नसे. त्यामुळे पेंढार, बंडखोर सोडले तर गुन्हेगार जातींची भूक खाण्यापिण्याच्या किंवा थोड्याफार कपड्यांच्या व पैशाच्या नडीपलीकडे नसे. त्यामुळे बहुतेक गुन्हे पोटासाठी होत. आतां सर्वच बदलले, आणि गुन्ह्यांना व्यापारी स्वरूप आले आहे. पूर्वी महार फार झाले तर मांसासाठी, जोड्यापुरत्या कातड्यासाठी, किंवा किरकोळ अदावतीने एकाददुसरे जनावर मारीत. व्यापारानिमित्त हिंदुस्थानांत दरवर्षी सुमारे सवाकोट जनावरें मरतात, पैकी अर्धलाख मुंबई इलाख्यांत मारली जातात, आणि त्यांची किंमत पंधरा वीस लाख रुपये येते. हल्ली कातडी व हाडकें मिळून दरसाल सवा दीड लाख मण माल परदेशी जातो. बहुतेक कातडें अमेरिका व जर्मनीत जातें, आणि त्याला भावही चांगला येतो. त्यामुळे गुरे मारणे हा एक रोजगार झाला आहे, आणि हाडकाकातड्यांचे व्यापारी महारमांगांना पैसे चारून