पान:गांव-गाडा.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १७७

आहे. आमच्यांत जे धनवान् झाले ते कुणबिकीवर झाले नाहीत. रोजगारधंदा, व्याजबट्टा, व्यापार करूनच त्यांनी धनसंचय केला. 'दर्याची माती दर्याला आटते' 'बासा न राहे और कुत्ता न खाये,' असे कुणबी आजवर म्हणत आला आहे; आणि ओढगस्तपणाच्या दुर्गुणांना तो बळी पडला आहे. 'कुणबीका बेटा और गहूंका आटा, पिटा उतना मिठा,' असे सर्वांच्या अनुभवास येते. ज्या कारूनारूंवांचून नडतें, अथवा जे कारूनारू अगर भिकार लोक बळजोरी किंवा नुकसान करतील अशी भीति असते, त्यांची भरती कुणबी मनसोक्त करतो. जेथें चाळ्याचिपळ्या करून निभण्यासारखे आहे, किंवा ज्यांचे भय बाळगण्याचे कारण नाहीं अशा हक्कदाराचे काम घेऊनही त्याच्या तोंडाला पाने पुसण्याला तो कमी करीत नाही. त्याने कधीही सावकाराचा धाक धरला नाही, व देण्याची पर्वा केली नाही. त्यामुळे देणे देण्याच्या कामी कुणबी हातचा फार जड झाला आहे. कुणब्याकडून सारा वेळेवर येण्याची खात्री असती, तर शेतमाल किफायतीने कुणबी विकीपर्यंत सरकार थांबतें, आणि पट्टीच्या हप्त्याच्या तारखा त्यापूर्वी नेमतेंना. कुणब्याशी व्यवहार निर्भीड मारवाड्यांनीच करावा असें म्हणून दक्षिणी सावकारांनी तोंड फिरविलें, व मारवाडी आतां म्हणतात की, कडव्या रोहिल्यांची सावकारी खरी. जसें ज्याचें नेट किंवा लुच्चेगिरी तसा कुणब्याजवळून पैसा निघतो. थापडवाईक सावकाराला किंवा जमीनदाराला कुणबी कुळे चांगलाच झोका देतात. रोख खंड कबूल न करता त्यांच्या जमिनी ते बटाईने ( वांट्याने ) घेतात. 'बटाई म्हणजे लुटाई.' शक्य तितकी मेहनत ते आपल्या स्वतःच्या शेतांत करून फावला वेळ बटाईच्या शेताकडे लावतात, आणि स्वतःच्या शेतावरीलसुद्धा खर्चाच्या सर्व बाबी दुसऱ्याच्या शेतावर घालतात. उदाहरणार्थ, बटाईच्या शेतांत गुरे चारण्यासाठी पडीत जास्त टाकावयाचे, त्यांत कोंब फुटल्यापासून तो पार खळें संपेपर्यंत आपले बैल चारावयाचे, धान्य हुरड्यावर आले की, घरच्या सर्व माणसांचं व पै-पाहुण्यांचे पोट त्यावर काढाव-