पान:गांव-गाडा.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६      गांव-गाडा.

ते शेत टाकून उद्योगधंद्यासाठी गांव सोडून दुसरीकडे जात नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना बी विकत आणावे लागते. ते ते कुणब्यांजवळून अगर वाण्यांजवळून आणतात. कुणब्यांजवळचे बी असले तर ते एकदाणी तरी मिळते. वाण्याजवळचे बी भेसळीचे असते. बी अर्थातच धान्यापेक्षा दुप्पट तिप्पट क्वचित् चौप्पटही महाग मिळते. बी रोखीने किंवा दुणीने विकतात. पीक तयार होतें न होते तोंच पट्टीचा हप्ता येऊन धडकतो, आणि व्यापारीही आपलें देणे वसूल करण्यासाठी व धान्याचा सट्टा करण्यासाठी टपलेले असतात. अनेक युरोपियन व्यापारीमंडळेसुद्धा शेतकऱ्यांना आगाऊ पैसे देऊन कपाशी-गळितासारखें अमुकच पीक करावयाला लावतात, व उभी पिकें खंडून घेतात. शेतकरी नडलेले व निरक्षर असतात. त्यांना बाजारभाव माहीत नसतो. वजनामापांची गुंतागुंत उकलणे त्यांच्याच काय पण शिकल्यासंवरल्यांच्याही आवाक्याबाहेर असते. शिवाय ज्यांना माल विकावयाचा, त्यांचा विसार त्यांनी घेतलेला असतो किंवा त्यांच्याशी वर्षभर देवघेव करावयाची असते. व्यापारी व त्यांचे दलाल नोकर अति स्वार्थी, व्यवहारदक्ष, व रंग दिसेल त्याप्रमाणे वागण्यांत तरबेज असल्यामुळे नुसत्या भावांत शेतकऱ्यांचा कमीत कमी शेकडा २५ तोटा होतो. ह्याखेरीज हिशेबांत, वजनामापांत, वर्ताळ्यांत, व्याजांत, कसरींत, मनोतींत, भोळ्यांत आणि नोकरदलालांच्या बहालीबक्षिशीत कुणबी पुष्कळ खराबीला येतो तें वेगळेच. मूळ ठिकाणावर हे खेडवळ वजनामापांत चकतातच; परंतु जेव्हां मोठ्या व्यापारी कंपन्या रेल्वेवर माल चढविण्याची बोली त्यांशी करतात, तेव्हां त्यांच्या फसवणुकीला व नागवणुकीला पारावार नसतो. कारण त्यांला रेल्वेच्या कांट्यावरील वजन कळत नसते, आणि स्टेशनावर हुंडेकऱ्यापासन तो बहुतेक सर्व रेल्वेनोकर एकाचे एक असतात. रेल्वेवर कशी हुल्लड चालते याचे एक उदाहरण पुरे होईल. तें असें:-कार्तिक महिन्यापासून शेवंतीच्या फुलांचा बहर असतो. त्यांना पुणे-मुंबईस चांगला भाव येतो, म्हणून धोंड मनमाड रेल्वेच्या शेजारच्या गांवांच्या मळ्यांत लोक