पान:गांव-गाडा.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दुकानदारी.
----------

 पूर्वीच्या अमदानीत राजे लोक कलासंपन्न लोकांना राजधानीत खुषीने किंवा जबरदस्तीने नेत, त्यामुळे कौशल्याची कामें राजधान्यांत विशेष नजरेस पडत. राजधान्यांप्रमाणे मोठाल्या यात्रांच्या ठिकाणीही लोक पुष्कळ जमत आणि तेथें मालाची देवघेव फार चाले व अजूनही चालते. आपल्या जग-विख्यात कवींनी आपली नाटकें यात्राप्रसंगांनी प्रथम लोकांपुढे मांडली ही गोष्ट सर्वश्रुत आहे. इंग्रजी अमलापासून मनु पालटला, आणि हुन्नरी लोकांना राजधानीत जाऊन राहण्याची तसदी नाही. ज्याचें, जेथे पोट भरेल तेथे त्याने खुशाल जावें आणि सुखाने नांदावे, अशी सर्वांस मुभा आहे. हिचा परिणाम असा झाला आहे की, व्यापाराच्या सोयीमुळे जी शहरें पुढे आली आहेत, त्यांत हुन्नरी लोक राजधान्यांपेक्षांही अधिक राहतात, आणि मोठ्या यात्रांपेक्षा देखील तेथें माल अधिक उठतो. जरी पूर्वीपेक्षा प्रवासाची साधने व वित्ताची सुरक्षितता वाढली आहे तरी खेड्यांत उदमी व कसबी लोकांची वस्ती जुजबी, गिऱ्हाईक कमी, व चढाओढ पूज्य अशी स्थिति असल्यामुळे त्यांमध्ये दुकानदारी यथातथाच आहे. म्हणून खेड्याचें गिऱ्हाईक रोजच्या बाजारासाठी आसपासच्या पेठेत किंवा शहरांत जातें, यात्रांच्या दिवसांत यात्रांला लोटते, आणि थांबण्याला सवड नसल्यास गांवच्या उदम्यांवरही गरज भागवून नेते. ह्यांशिवाय हाळीपाळी करणारे किरकोळ दुकानदार आपला माल खेड्यांनी नेऊन विकतात. खेड्यांत नाण्याची हलकीशी गरज भागते. मोठी गरज वारण्यासारखे सराफ खेड्यांत दुर्मिळ. ते कसब्यांत, पेठेत किंवा शहरांत राहतात, आणि तेथून आपल्या वळणांतल्या गांवांना कर्ज पुरवितात. ह्याप्रमाणे खेड्यांतली दुकानदारी जागेवर, यात्रांत व आसपासच्या कसब्यांत, पेठेत किंवा शहरांत चालते. शेतीचा हंगाम सोडून बाकी वर्षभर मंदीच असते. नाही म्हणावयाला