पान:गांव-गाडा.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०      गांव-गाडा.

सांगतात की, निजामशाहीत भिकार ठरत नाही. गांवकरी व अधिकारी त्यांना झोडून पिटाळून लावतात. मोकळ्या पायाच्या इंग्रजीत तसे होणे शक्य नसल्याने एकंदर आयतखाऊंचा प्रश्न सोडविणे कठीण आहे, व तो आमच्या लोकांच्या मायाळूपणानें अधिकच कठीण झाला आहे. प्रत्येकानें काम करावे आणि पोटाला मिळवावें. असें जो करीत नाही व मला पोटाला नाही म्हणून भीक मागण्याला येतो, त्याला भीक घालू नये. तो उपाशी मरत असला तर त्याला काम करण्यास सांगावे, पण फुकट पोटाला देऊ नये. तसेंच पैसा गांठी असल्याशिवाय कोणालाही भटकतां येऊ नये. अशी तजवीज झाली पाहिजे आणि हे काम लोकांचे आहे, ह्यांत व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येण्यासारखे काही नाही. वाटेल त्याने वाटेल त्या साधूला किंवा साधूंच्या मेळ्याला वाटेल तेथें न्यावे आणि त्यांचा खर्च सोसावा. ज्या भिक्षुकांजवळ वाटखर्ची नसेल त्यांना आमंत्रणाशिवाय गांवोगांव भटकतां येऊ नये, आणि ते गांवी आल्यास त्यांना तेथें भिक्षा मिळू नये व मागतां येऊं नये. आमंत्रित भिक्षुकांची बरदास्त आमंत्रण देणारांनी करावी, इतरांस त्यांची तोषीस लागू देऊ नये. असे झालें म्हणजे आमंत्रण देणारे अंथरूण पाहून पाय पसरतील. असले कांहीं सिद्धांत लोकांच्या मनांत बिंबल्याशिवाय आणि तदनुसार वागण्याचा त्यांनी निर्धार केल्याशिवाय भिकाऱ्यांची व गुन्हेगारांची संख्या आणि देशाचें दारिद्रय हटणार नाही. निमंत्रण नसलेल्या साधूंच्या फिरतीवर पोलीसने लक्ष ठेवावें आणि लोकांना त्रास होईल अशा रितीने कोणालाही भीक मागूं देऊ नये. मुंबई डिस्ट्रिक्ट पोलीस आक्ट (१८९० चा अंक ४) कलम ६१ रकम (एस्) नुसती कायद्यांत धूळ खात पडली आहे. तिचा जर गांवांत, यात्रांत व आठवडे बाजारांत अंमल केला तर पुष्कळ साधू आणि पंगू दुसरा धंदा पाहतील. जो कोणी त्रासदायक रीतीनें भीक मागतो अथवा भीक मिळविण्यासाठी रस्त्यांत किंवा रस्त्याजवळ रोग किंवा व्यंग किंवा किळसवाणी जखम दाखवितो त्याला पन्नास रुपयेपर्यंत दंड सदर कायद्याच्या सदर कलमांत सांगितला आहे. तसेंच अठरा वर्षांचे आंतील पुरुषाला