पान:गांव-गाडा.pdf/160

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १३९

ह्यांनी खुशाल यात्रा, वाऱ्या व देवदेव करावा. मजुरीचे दर गेल्या पंचवीस वर्षांत दुपटीवर चढले आहेत. धष्टपुष्ट आंधळ्यांना सुद्धा डोळसपांगळ्यांची मदत घेऊन चार पांच पायल्या दळण दळण्यास हरकत कोणती? आपापल्या वकुफाप्रमाणे ज्या त्या भीकमाग्याने धंदा केला तर मजुरांची संख्या वाढून मजुरीचे दरही सैलावतील. अमुक तिथीला अमक्या यात्रेला गेले पाहिजे अशी निकड दाखवून भाड्याचे पैसे मागणारे ह्या वर्गात पुष्कळ असतात. पण ते असा विचार करीत नाहीत की, आपण रिकामटेकडे असतांना दोन तेथे चार महिने पायी प्रवास करून तिथि कां गांठू नये ? भिक्षुक येथून तेथून अर्कट व स्वार्थी ही खूणगांठ हृदयाशी बांधून त्यांना पुरे कसाला लावण्याचा सर्व जातींच्या, पंथांच्या व संप्रदायांच्या लोकांनी निर्भिडपणाचा निश्चय केला पाहिजे, आणि या कामांत कोणी कोणाला गळ घालू नये. पुष्कळ वेळां असें होतें कीं, गांवकरी एकमेकांच्या भिडेला गुंततात आणि अवघेही बुडतात. भवाळ पाटलाने माळकरी कुळकर्ण्याला म्हणावें की आम्ही तुमच्या दिंडीची संभावना केली तेव्हा तुम्ही मानभावाचे मेळ्याला मदत करा, आणि दोघांनाही मुसलमान मुलान्याने म्हणावें की, आम्ही तुमच्या लोकांच्या साधूंंना वर्गणी देतो, तर तुम्हीही आमच्या फकिराचा सवाल खाली जाऊ देऊ नका. ज्यांच्या गुणांची खात्री पटली असेल अशा-मग तो कोणीही असो-व्यक्तिविशेषाच्या भजनीं तुम्ही खुशाल लागा. कोणी लोकोपयोगी धर्मसंस्थेचा जीर्णोद्धार करीत असेल तर मनाची खात्री करून घ्या आणि त्याला यथाशाक्त साह्य करा. पण पिढीजाद भिक्षुकी किंवा पंथ किंवा सांप्रदाय या भपक्याला भुलून आपले नांव वाढविण्यासाठी कोणी स्वतः बुडूं नये, व इतरांनाही बुडवू नये. वारकऱ्यांना लोक फारसे भीत नाहीत; पण गोसावी, बैरागी, फकीर, मानभाव ह्यांची लोकांना भीति वाटते. त्यांच्या त्राग्यांना लोक चळचळा कांपतात; याशिवाय हे लोक म्हैस उडवतील, झाडे, फळे जाळतील, विहिरीचे पाणी पळवतील किंवा आग लावतील, असें ह्या साधूंचे लोकांना भय राहते. असें