पान:गांव-गाडा.pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      ९५


फुगत गेली असावी असे वाटते. आतां दंगेधोपे नामशेष आहेत, आणि क्वचित् झाल्यास ते मोडण्याला आणि गुन्ह्याचा बंदोबस्त करण्याला सरकारचें लष्कर व पोलीस आहेच. सरकारच्या निरनिराळ्या खात्यांनी व सुधारणांनी महार-जागल्यांचें काम किती कमी केलें आहे, आणि त्यांतलेंही ते कसे चुकवितात ह्याचे दिग्दर्शन वर केले आहे. तरी पण कामाच्या मानानें पाटील-कुळकर्ण्यांची संख्या ज्याप्रमाणे सरकारने उतरविली, तशी महारजागल्यांची उतरविली नाही. जरूरीपेक्षा जास्त कामकरी असले म्हणजे खेळणी चालून काम बिघडते,आणि खर्च मात्र अधिक येतो. 'रिकामा न्हावी आणि भिंतीला तुमड्या लावी,' हा सर्वानुभव महार-जागल्यांच्या संख्येला लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. नगर जिल्ह्यांत सुमारे चार हजार वस्तीच्या पारनेर गांवाला महार-जागल्यांचे राजरोष लष्कर ५० आहे. ते असें:-३२ महार, ४ वेसकर, ८ रामोशी जागले, २ सोनार व २ मुसलमान जागले ऊर्फ हावालदार आणि एक दोन नायकवाडी. इतके लोक तेथे शिवारांत व बाजारांत हक्क बेधडक उकळतात. सरसकट २५० चौरस मैल क्षेत्र व पाऊणलाख लोकवस्ती असणाऱ्या तालुक्याला १५।१६ मुलकी शिपाई व ३०।३५ पोलीस शिपाई पुरतात, तर खेड्याच्या कामाच्या मानाने प्रत्येकी किती महार-जागले लागतील हे मुकरर करणे फारसें कठीण नाही. दुष्काळाच्या दिवसांत लोकांत चलबिचल व हालचाल जास्त असते, गुन्ह्यांचे प्रमाण चढते, आणि तपासणीअंमलदारांची संख्या वाढून त्यांचा गांवगन्नां मुक्कामही अधिक होतो. म्हणून सुबत्तेपेक्षां दुष्काळांत गांवकीचे कागदी व पायपिटीचे काम रगड माजते, आणि त्यांतच महार-जागले पोटामागें गांव सोडून जाण्याचा संभव अधिक असतो. अशा स्थितीत गांवचे किती महार-जागले डोलांत ( सरकार दुष्काळांत महार-

-----

१ धांदरफळ तालुके संगमनेर जि.नगर येथे लोकसंख्या सुमारे १६२५ वसूल सुमारे ३७०० रुपये असून तेथे महार १६, वेसकर ४, आणि जागले ३ आहेत. ठाकुर पिंपळगांव तालुका शेवगांव जि.नगर येथें गांवाची लोकसंख्या ८०० असून गांवाला ८ महार व 2 कां 3 जागले आहेतं.