पान:गांव-गाडा.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४      गांव-गाडा.


जो तो आपली जागा साफ करतो. देशांत जसजशी दुकानदारी वाढली, सडका, रहदारी बंगले झाले, तसतशी सरबराईच्या कामांतील महारजागल्यांची पायपीट कमी झाली. हव्या त्या जिनसा दुकानांत मिळू शकतात: आणि सरकारी सामान व्यवस्थेने लावणं, ते सांभाळणे, गाड्या ठरविणे इत्यादि कामांसाठी अंमलदारांबरोबर सरकारी खासगी नोकर असतात. सरबराईच्या कामांत महार जागल्यांना चांगली पैदास असते. त्यांना फिरती अंमलदार दोन ते आठ दहा रुपयेपर्यंत पोस्त देतात. मामलेदारापर्यंत सरकारी सामानाचे गाडीभाडे मिळते, त्यामुळे महारांची सरकारी बिगारही कमी झाली. मनुष्याचे वजन पडण्याला हिंदीस्तानांत तरी संपत्ति किंवा अधिकार लागतो. पाटील-कुळकर्ण्यांची दोन्ही अंगें उणी पडल्यामुळे त्यांना महारजागल्यांकडून सक्तीने काम घेतां येत नाही. पाटील-कुळकर्ण्यांनी दिलेले सरकारी कागद महारजागल्यांनी ठाण्यांत न आणतां टपालांत टाकले, ते नाटपेड झाले, आणि त्यांचे पाटील-कुळकर्ण्यांनी भरलेलें हांशील महारजागल्यांनी दिले नाही, असे कित्येक वेळां पाहण्यांत येते. महार-जागले पूर्वीइतके पाटील-कुळकर्ण्यांबरोबर गांवांत व परगांवीं जात नाहीत. शंकुसाखळी घेऊन सर्कल इन्स्पेक्टरबरोबर शिवारांत जाण्यासाठी महार काढणे झाल्यास पुष्कळ पाटलांना महारवाड्यांत हेलपाटे घालावे लागतात; नंतर कोणाची बारी आहे याची विचारपूस सुरू होते, आणि बारीवाला घरी नाहीं अशी तास अर्धातास खळखळ चालून कसातरी महार मिळतो. लोकस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या परशराम कवीने केव्हांच भाकीत केलें,

पाटीलकुळकर्णी नांव उगीच घालून दमले येरझारा ।
सत्ता साहेबी अगदी बुडाली महाराचा त्यांहूनी तोरा ॥

 स्वराज्यांत गांवकऱ्यांचे वित्त व जीवित ह्यांचे नेहमीचे रक्षण सरकाराकडून होत नसे. म्हणून गांवगाड्याने महार-जागल्यांचे एक लहानसें लष्कर तयार केलें; आणि दरोडखोर व बंडखोर ह्यांशी झुंजणे व गांवमुकादमानीतली जातिपरत्वे कामें, ह्यांचा ठोकळ अंदाज पाहून गांवाने त्यांची संख्या ठरविली. पूर्वीच्या भोपळसुती अमदानीत जसजसें फावलें तसतशी ती