पान:गद्यरत्नमाला.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
गद्यरत्नमाला.


रून नाटकास विशेष शोभा येण्यास कवीनें दुसन्या बाहेरच्या पुष्कळ गोष्टी घातल्या आहेत. यासाठीं मूळची गोष्ट कशी आहे. हें मराठी वाचकांस कळावे याकरितां ती भारतावरून यांत लि- हिली आहे. हींत कित्येक ठिकाण अत्युक्ति आहे, तथापि त्या वेळच्या ऋषींच्या व राजांच्या चाली व स्त्रियांची स्थिति, इत्या दि गोष्टी कळतील.
 जनमेजय राजा वैशंपायन ऋषींस ह्मणतो - महाराज ब्राह्मण- श्रेष्ठ, आपण देवादिकांच्या अवतारांचे कथन केलें तें श्रवण करून फार आनंद झाला. आतां कुरुवंशाचें मुळापासून श्रवण करावें अशी माझी इच्छा आहे.
 वैशंपायन म्हणतात - कौरवांचा मूळपुरुष प्रतापी दुष्यंत राजा होय. हा युद्धामध्ये फार कुशल असून समुद्रवलयांकित पृथ्वीचें राज्य एकटा करीत असे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, म्लेच्छ इत्यादि अनेक जातींचें तो यथाशास्त्र पालन करीत असे. हा राजा राज्य करीत असतां सर्व ज्ञातींतील कोणाहि मनुष्यास पाप करण्याची इच्छा होत नसे. सर्व लोक नेहमीं धर्मतत्पर असत. चोर, रोग, क्षुधा यांचें तिलप्रायहि कोणास भय नसे. आपापली कर्तव्यकर्मे करून लोक कालक्रमणा करीत. पर्जन्य वेळच्या वेळीं पडे. धान्यें उत्तम प्रकारचीं पिकत. राज्यांत सर्व ठिकाणीं द्रव्य, पशु, वगैरे संपत्ति फार असे. ब्राह्मण स्वधर्माचरण करून सत्यानें वागणारे होते. राजा स्वतः फार बलाढ्य असून बाहुयुद्ध, गदायुद्ध, यांत फार निपुण होता. तसाच घोड्यावर व हत्तीवर बसण्यांत फार वाकबगार होता. विष्णूप्रमाणें बलिष्ठ, सूर्याप्रमाणें तेजस्वी, समुद्राप्रमाणे गंभीर, पृथ्वीप्रमाणे सहनशील, असा असून सर्वोस अतिप्रिय होत्साता आनंदानें राज्य करीत असे.
 जनमेजय ह्मणतो - महाराज मुनिश्रेष्ठ, भरत व शकुंतला यांची उत्पत्ति, तसेच दुष्यंतास शकुंतला कशी प्राप्त झाली हे सर्व मी विस्ताराने ऐकण्यास इच्छितों.