पान:गद्यरत्नमाला.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
गद्यरत्नमाला.


लाल झालेल्या लोखंडाच्या गोळ्याजवळ धूम पाहूं लागला तर त्यास सांपडणार नाहीं. तेव्हां त्यास आपले ज्ञान खोटें असें कळेल. सर्व ब्राह्मणांच्या गळ्यांत जानवीं असतात ह्मणून ज्याच्या गळ्यांत जानवें असेल तो ब्राह्मण असें कोणी झटलें तर तें खोटें आहे. सृष्टीमध्ये कोणत्याही दोन पदार्थात पूर्ण सादृश्य नाहीं. म्हणून उपमानज्ञान खोटें होण्याचा संभव फार. याकरितां तें अगदीच लटपटीत होय. तसेंच जगांत खोटे बोलणारे फार, यामुळें शाब्दज्ञान पुष्कळ वेळां खोदें होतें.
 वरील चार प्रकारांपैकी प्रत्यक्ष आणि उपमान या दोहोंनीं ईश्वराचें ज्ञान होण्याचा मुळींच संभव नाहीं. ईश्वर निरवच्छिन्न, निर्गुण, निराकार, निर्विकार असल्यामुळे अवच्छिन्न, सगुण, साकार व सविकार अशा इंद्रियांनीं त्याचें ज्ञान होणे ही गोष्ट असंभवनीय होय. तसेंच ईश्वरासारखी दुसरी कोणतीच वस्तु नसल्यामुळे सादृश्यानें त्याचें ज्ञान व्हावयाचें नाहीं. आतां बाकी राहिले दोन प्रकार, अनुमान आणि शब्द. या दोहोंन ईश्वराचे ज्ञान होतें तें असे. जगांत कोणतेंहि कार्य कर्त्याशिवाय होत नाहीं. तर या जगद्रूप कार्यास कोणी तरी कर्ता अवश्य असला पाहिजे; असा जो कर्ता तोच ईश्वर. जगांतील कोण- त्याहि वस्तूंमध्ये न्यूनाधिक कौशल्य पाहिले म्हणजे कर्त्याच्या आंगच्या कमजास्त चातुर्याची कल्पना मनांत येते. तसेच अनंत चमत्कारांनी युक्त हैं पंचमहाभूतात्मक विश्व पाहून त्याचा कर्ता- हि सकलगुणसंपन्न अनंतशक्ति असला पाहिजे असें सहज मनांत येतें. तसेंच शास्त्राच्या ग्रंथांतून जें ईश्वराच्या स्वरूपाचें वर्णन केलें आहे, त्यावरून आपणांस ईश्वराचें ज्ञान प्रत्यक्ष होतें; व असे ग्रंथ ज्यांस अतींद्रिय ज्ञान नाहीं, त्यांस लिहितां यावयाचे नाहींत, अशी खातरी असल्यामुळे हें शब्दज्ञान खोटें असण्याचा संभवच नाहीं.