पान:गद्यरत्नमाला.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
गद्यरत्नमाला.


कधीं शाल्योदन भक्षण करतो, कार्यसिद्धीविषयी उत्सुक असा शहाणा मनुष्य सुख किंवा दुःख यांस मोजीत नाहीं.
 ऐश्वर्याचें भूषण सौजन्य, शौर्याचें भूषण वाक्संयम, ज्ञानाचें भूषण शांति, विद्येचें भूषण विनय, द्रव्याचें भूषण सत्पात्रीं व्यय, तपाचें भूषण अक्रोध, समर्थाचें भूषण क्षमा, धर्माचें भूषण नि- ष्कपटपणा, सर्वोचें कारण सुस्वभाव आहे. सुस्वभाव हाच उत्तम अलंकार होय, ही गोष्ट सर्वास लागू आहे.
 नीति जाणणारे निंदा करोत, किंवा स्तुति करोत, लक्ष्मी येवो किंवा जावो, मरण आज येवो किंवा दुसऱ्या युगीं येवो, न्याय्य मार्गापासून शहाणे लोक पाऊल हालवीत नाहींत.
 आळस हाच मनुष्याच्या अंगांत मोठा रिपु आहे, उद्योगा- सारखा दुसरा बंधु नाहीं, ज्याच्या योगानें मनुष्य नाश पावत नाहीं.
 झाड तोडलें तरी पुनः फुटतें, चंद्र क्षीण झाला तरी पुनः वाढतो, असा विचार करून साधुजन विपत्ति आली तरी दुःखी होत नाहींत.
 दैवाप्रमाणे फलप्राप्ति होते, दैवानेंच बुद्धि होते, हें खरें अ सलें तरी शहाण्यानें चांगला विचार करून कर्म करावें.
 टक्कल पडलेल्या एका मनुष्याचें डोकें उन्हानें तापलें, याकरितां सावलीत बसावें म्हणून तो एका झाडाखालीं गेला. दुर्दैवानें तें झाड ताडाचें होतें. तेथें बसणार तो इतक्यांत झाडावरून एक फळ पडलें तें ताडदिशीं त्याच्या डोक्यावर आपटलें. दुर्दैवी मनुष्य कोठें गेला तरी तेथें विपत्ति ठेविली आहेच.
 चांगलें, वाईट, कोणतेंहि काम करण्यापूर्वी शहाण्यानें त्याचा परिणाम मनांत आणावा. उतावळीनें केलेल्या कामाचा पश्चात्ताप मरणापर्यंत मनास टोंचीत असतो.

लाभ कोणता ?

गुणिजनांचा समागम.


दुःख कोणतें?

मूर्खाची संगत.


नाश कोणता ?

प्रसंगावधान नसणें.