पान:गद्यरत्नमाला.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भर्तृहरि

५९


लागतात, सत्पुरुष समृद्धीनें नम्र होतात; परोपकारी जे आहेत, त्यांचा स्वभावच हा आहे.
 कान शास्त्रश्रवण केल्यानेंच शोभतो, भिकबाळीनें शोभत नाहीं. दानाने हात शोभतो, कड्यानें शोभत नाहीं. कृपाळू मनुष्याचें शरीर परोपकाराच्या योगानें शोभतें, चंदनाच्या उटीनें शोभत नाहीं.
 पापापासून निवारण करणें ( पाप करूं न देणें ), हिताकडे वळविणें, दुर्गुण गुप्त ठेवणें, गुण प्रसिद्ध करणें, विपत्ति आली तरी न सोडणें, प्रसंगीं देणें; हें सन्मित्रांचें लक्षण होय, असें सज्जन ह्मणतात.
 स्वार्थ टाकूनहि परहित करतात, ते सत्पुरुष होत. स्वार्थहानि न करितां परोपकार करतात, ते सामान्य मनुष्य होत. स्वकार्य साधण्याकरितां दुसऱ्यांचा नाश करतात, ते मनुष्यांतले राक्षस समजावयाचे. जे स्वहित नसतांहि दुसऱ्यांचा नाश करितात, ते कोण, हें आह्मी समजत नाहीं.
 साधूंची मैत्री दूध आणि पाणी यांसारखी असते. दूध पहि- ल्याने पाण्यास आपले सर्व गुण देतें. दुधाचा ताप पाहून पाणी आपणास जाळून घेतें. मित्राची विपत्ति पाहून दूधहि अभिप्रवेश करण्यास तयार होतें. परंतु पाण्याची गांठ पडतांच शान्त होतें.
 लोभ सोडून दे, क्षमा धारण कर, उन्मत्तपणा टाक, पापवा. सना धरूं नको, खरें बोल, साधूंच्या मार्गाचें अनुसरण कर, विद्वानांची सेवा कर, मान देण्यास योग्य असतील त्यांस मान शत्रूंवर कृपा कर, आपल्या अंगचे गुण वर्णू नको, कीर्तीचें रक्षण कर, दुःखितांवर दया कर, हें सर्व साधूंचें लक्षण आहे.
 ज्यांची मनें, वाणी, शरीर, हीं पुण्यरूप अमृताने भरली आहेत, जगावर शेंकडों उपकार करणारे, दुसऱ्याचा लेशमात्र गुण पर्वतासार• खा करून अंतःकरणांत आनंद पावणारे, असे कितीएक साधु आहेत.
 कधीं भूमीवर निजतो, कधीं पलंगावरहि पडतो, कधीं घोंगडी पांघरतो, कधीं उंची वस्त्रे वापरतो, कधीं भाजी खाऊन राहतो,