पान:गद्यरत्नमाला.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सृष्टिनिरीक्षण.

१६९


नाहीं, त्यापासून अनेक ऐहिकहि लाभ आहेत.परमेश्वरावर विश्वास ठेवणारा मनुष्य सर्वदा शांत व उल्हासयुक्त असतो. खऱ्या सुखाचें साधन दुसरें कांहीं त्रिभुवनांत सांपडावयाचें नाहीं. या करितां एका भगवद्भक्त विद्वानानें हाटलें आहे; सर्व शास्त्र शिकलों, त्यांचा पुनः पुनः विचार केला, त्यांपासून एकच सिद्धांत ठरतो तो हा कीं सर्वदा परमेश्वरावर भरवसा ठेवून वागावें.

सृष्टिनिरीक्षण.


 ह्या अफाट जगांत तिलमात्र अशी जागा नाहीं कीं, तेथे सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वराचें चातुर्य पहावयास सांपडणार नाहीं. विषयासक्त मनुष्यांस परमेश्वराचें ज्ञान होणें फार कठिण आहे; तथापि मनुष्य थोडा विचार करून सृष्टिरचनेकडे पाहील तर त्यास तींतील चमत्कार व सृष्टिकर्त्यांचे चातुर्य यांचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीं. मनुष्य किती कां अडाणी असेना, त्यानें थोडें लक्ष पुरविले पाहिजे. असें केलें तर ईश्वराची अगाध करणी पाहून त्याच्या चित्तास समाधान झाल्याशिवाय राहणार नाहीं. ईश्वरभक्ति एकीकडे ठेवून केवळ सुखाचा विचार केला तरी इतर गोष्टींपासून जें सुख होतें, त्यापेक्षां सृष्टिचमत्कारांच्या अवलोकनापासून मोठें सुख होईल यांत संशय नाहीं. सृष्टि- सौंदर्यापासून जें सुख होतें तें शुद्ध सुख असतें. संसारांतील विषयसुख बहुधा दुःखस्पृष्ट असतें तसें हें नसतें.
 भक्तिपुरःसर सृष्टिरचनेचा विचार केला तर फारच मोठें अप्रतिम सुख प्राप्त होतें. परमेश्वराचे महत्त्व मनांत येऊन मनाची स्थिति विलक्षण शांत व गंभीर होते. पहा, थोडा विचार केला तरी केवढाले चमत्कार मनांत येतात ! नुसतें वर पाहिले तर आकाशांत काय काय अद्भुत चमत्कार दृष्टीस पडतात ! आपल्या प्रचंड तेजानें विश्व प्रकाशित करून सर्वोस सजीव करणारा असा नियमाने आकाशांत भ्रमण करणारा सूर्य; रात्रीस असंख्यात