पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

वान अशी संतति निर्माण व्हावी अशी इच्छा असेल, आणि तशी इच्छा असलीच पाहिजे, तर विवाहित स्त्रीपुरुष एकजव, समरस व समोद्दिष्ट असणें अपरिहार्य नाहीं काय ? “ अर्धांगी "ची पौराणिक कल्पना हेंच ध्येय सूचित करते; पण हे मनांतील मांडे खाऊन कोण सुखी होणार ? परमेश्वराचा उद्देश सफल होण्यास परमेश्वरानें मनुष्यास कोणतेंहि साधन उपलब्ध करून ठेवलें नाहीं ह्याबद्दल परमेश्वरास दूषणे देण्यास जीभ लांब झाली, तर त्यास कांहीं अगदींच वावगे म्हणतां येणार नाहीं. अनु- रूप स्त्रीपुरुषांची सांगड कशी घालतां येईल ह्याचा विचार करून अखे- रीस मोठमोठ्या ज्ञान्यांनीहि हात टेकले. मनुष्याचें ह्या कामांत कांहींहि चालूं द्यावयाचें नाहीं असा परमेश्वराने जणूं काय चंग बांधला आहे असें वाटतें. एवढेच नव्हे तर विसदृश, अननुरूप किंवा भिन्न रुचीचीं अशीच जोडपी बनावीत असें परमेश्वराचें अकटोविकट प्रयत्न चालूं असावेत असा भास होतो. निदान हें दैवी गूढ उकलण्यास मानवी बुद्धि असमर्थ आहे खचित.
 प्रेमाच्या चुनेगच्ची पायावर विवाहवास्तु उभारली म्हणजे तो संबंध सुखावह होईल व ग्रंथि अभेद्य राहील ही पाश्चात्यांची कल्पना किती फोल आहे हें हरघडीस होणाऱ्या असंख्य घटस्फोटांवरून सिद्ध झालें आहे. पाश्चात्यांचे आंधळें अनुकरण करून आम्हीहि आतां प्रेम म्हणून टाहो फोडूं लागलों आहों. पण ह्यामध्ये आपण आपली नुसती फसवणूक करून घेत आहों. मातेचें आपल्या मुलावर मात्र उपजत, सहज, अहेतुक व उत्कट असें प्रेम असतें. मूल कितीहि कुरूप असो, मुलगी असो वा मुलगा असो, इष्ट असो वा अनिष्ट असो, त्या शेंबड्या, रोगी, पाप्याचें - पितर बनलेल्या मुलाचें त्याची माता प्रेमाचें भरतें येऊन जेव्हां चुंबन घेते, एकनिष्ठतेनें जेव्हां त्या अनाथ तान्ह्याला स्तनपान देते व रात्रीचा दिवस करून त्याची शुश्रूषा करते, त्या वेळेस मात्र खऱ्या स्वर्गीय प्रेमा-