त्यामुळे त्यांना जास्त किंमत देता येते. दुग्धजन्य पदार्थ बाजारात खूप चांगली किंमत मिळवितात हे खरे पण ते पदार्थ तयार करण्याचा खर्च त्याहीपेक्षा जास्त येतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था तोट्यात जातात.
हे असे आहे तर मग परदेशी कंपन्यांना हा धंदा करणे फायद्याचे कसे काय वाटते? चीज तयार केल्याने सुमूलचा तोटा होतो पण नेस्लेला अफाट फायदा होतो हे कसे काय? या रहस्यातच एक मोठी मख्खी आहे. कोणताही प्रक्रियेचा कारखाना, मग तो साखरेचा असो, का चीजचा असो का अगदी शॅम्पेनसुद्धा तयार करण्याचा असो तो, हिंदुस्थानात काढणे यात कठीण काहीच नाही. खिशात पैसा असला तर पोटातले पाणीसुद्धा न हलवता कारखाना सुसज्ज तयार मिळू शकतो. असे कारखाने उभारून देण्याची कंत्राटे घेणाऱ्या अनेक कंपन्या हिंदुस्थानात आहेत. वारणेला श्रीखंड करायचे झाले किंवा आणंदला चीज तयार करायचे झाले तर या कंपन्यांशी बोलणी करून त्यांना कंत्राटे देणे यापलिकडे फारसे काही करायचे राहात नाही. पण ही भांडवली गुंतवणूक इतकी अवाढव्य होते की यंत्राच्या आयुष्यकाळात त्यावरील व्याज आणि घसारा काढणेसुद्धा अशक्य व्हावे. नेस्लेसारख्या कंपन्यांना ही अडचण नसते. आवश्यक ती यंत्रसामुग्री ते स्वतःच्या साधनांतून त्या मानाने किरकोळ खर्चात तयार करतात आणि त्यामुळेच त्यांना या धंद्यात फायदा काढता येतो.
भारतात प्रक्रियेचे कारखाने काढायचे म्हटले म्हणजे या कंत्राटदारांचाच आश्रय घेणे अपरिहार्यच होऊन जाते, शेतीमालावरील प्रक्रिया हे तसे मोठे उंचीचे तंत्रज्ञान आहे. पदार्थांचा मूळचा स्वाद कुठेही बदलू न देता निर्जंतुक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून सोयीस्कर रीतीने त्यांना डबाबंद करून ग्राहकापर्यंत पोहाचविणे हा सगळा कार्यक्रम तसा मोठा कठीण आहे.
तरीदेखील, पैसे टाकून का होईल असा सुसज्ज कारखाना उभा राहिला म्हणजे संबंधितांना त्याचे मोठे कौतुक वाटते. फायदा होवो न होवो आपण काही कामगिरी बजावली असा एक अभिमानही त्यांना साहजिकच वाटतो. या सगळ्या कोऱ्या करकरीत यंत्रसामुग्रीची बटणे कधी आणि कशी दाबायची हे ठीकठाक कळू लागेपर्यंत आणखी सुधारित तंत्रज्ञानाची यंत्रसामुग्रही पुढे येते आणि बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्याकरिता ती खरीदणे आवश्यक होऊन