पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसते. जुन्या तंत्रज्ञानाचा वास लागून तो आत्मसात होण्याआधीच नवीन तंत्रज्ञान पुढे येते आणि भारत व विलायतेतील तंत्रज्ञानाची दरी अधिकाधिक रुंदावत जाते. या असल्या 'चैत्रगौरी' कारखानदारीमुळेच तर हिंदुस्थानवरील आजचे आर्थिक अरिष्ट ओढवले आहे.
  स्त्रियांवर विपरीत परिणाम
 या कारखानदारीने झालेल्या मर्यादित आर्थिक विकासाचा एक अगदी विपरीत परिणाम स्त्रियांवर होताना दिसतो. परिसरांतील विकास जितका पुढे जावा तितके स्त्रियांच्या आयुष्याची गुणवत्ता आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा उतरतात. उदाहरणांवरून हे समजणे जास्त सोपे जाईल.
 एखादा कारखाना उभा राहिला आणि आसमंतात जरा पैसा खेळू लागला की पहिल्यांदा जागोजाग दारूची दुकाने दिसू लागतात, हातभट्टीची चलती होते. एक बकालीपणा तयार होतो. ज्या प्रदेशात स्त्रिया अगदी अंधार झाल्यावरसुद्धा बिनधास्त, मोकळेपणे फिरू शकत असत तेथे संध्याकाळ झाल्यानंतर, अंधार पडल्यावर त्यांना घराबाहेर पडणेसुद्धा मोठे दुरापास्त होऊन जाते. घर ते शेत आणि शेत ते घर असे कुंपण त्यांच्या हालचालींवर पडते. पंजाबसारख्या राज्यात तर स्त्रियांची कुचंबणा याहूनही अधिक होते. इतर राज्यातील शेतमजूर तेथे मुबलक मिळू लागले आणि असुरक्षिततेचे वातावरण वाढले तसे स्त्रियांना शेतावर जाण्याचीसुद्धा शक्यता कमी होऊ लागली. त्या घरातच बंदिस्त झाल्या. निदान मोकळ्या हवेत काम करण्याचे स्वातंत्र्य जाऊन अंधाऱ्या घरात सर्वांकरिता रोट्या बनविण्याचे काम त्यांच्या कपाळी आले.
 यंत्रांची मदत मिळू लागली म्हणजे आणखीही मोठा विचित्र प्रकार घडतो. डोक्यावर भारी पाटी घेऊन बाजारात जायचे असले की ते काम बाईचे, पण मालकाने टॅ-क्टर घेतला की माल भरलेला टॅ-क्टर बाजारात डौलात घेऊन जाण्याचे काम पुरुषांचे. अवजड अडकित्त्याने कडब्याची कुट्टी करायचे काम बाईचे, पण कुट्टी यंत्र आले तर त्याची बटणे दाबायचे काम पुरुषांकडे जाते.

 बळिराज्याकडे वाटचाल करतांना आपण आपल्याच पावलाखाली बळिराजाला पुन्हा एकदा नव्याने तुडवत नाही ना याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आधुनिकीकरण करायचे तर आहे. कारखानदारी वाढवायची आहे, औद्योगिकरण करायचे आहे, शेतीवरील माणसे बिगरशेती कामाकडे न्यायची

२२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने