खाते चालू ठेवीत. त्याची बायको बिचारी सगळ्या देणेदारांकडे जाऊन विनवणी करी की माझ्या नवऱ्याला नवे कर्ज देऊ नका आणि जुने कर्ज परत मिळण्यासाठी तगादा लावा. तिचे कृत्य तसे पतीद्रोही, पण हळूहळू त्यामुळे तिच्या नवऱ्याला कर्ज मिळायचे थांबून गेले. सुदैवाने तो काही पैसे मिळवण्यासाठी वाईट मार्गाला लागला नाही आणि त्यांची परिस्थिती थोडीफार सुधारली. मला शक्यता असती तर मीही आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि इतर धनकोंना जाऊन हात जोडून विनंती केली असती की नवे कर्ज देऊ नका आणि जुन्या कर्जाचा तगादा लावा. म्हणजे बांडगुळांचे अर्थकारण आपोआप संपेल. आणि उत्पादकांची शान वाढेल. पण असे काही होणार नाही. “इंडिया” वाल्यांना कर्जाची जितकी आवश्यकता आहे, तितकीच धनकोंना भारतातील “नेहरूवादी” व्यवस्था जरूरीची आहे. त्या अवस्थेत बदल घडवून आणण्याचा त्यांचा आग्रह काही, देशाच्या हिताच्या तळमळीपोटी आहे असे नाही. पण एवढे नक्की की शेवग्याचे झाड तोडायचे काम कुणाला तरी करावे लागणार आहे.
(२१ जुलै १९९१)