पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


'तुतारी वाङ्मय व दसरा' असं त्याचं शीर्षक होतं. कारण मूळ लेखात माडखोलकरांनी दसरा कविता म्हणजे केशवसुतांच्या ‘तुतारी'चे अधम अनुकरण' असल्याचे विधान केले होते. लेखासोबत आपली ‘होळी' ही नवरचित कविता ‘आदर्श, या टोपण नावावर पाठवली होती. दोन्ही रचना प्रकाशित झाल्या. याच दरम्यान बरेच दिवस मनात खदखदत असलेल्या वेगळ्या विसंगतीवर एक लेखमाला लिहायचे ठरवून त्याची पहिली खेप ‘उद्यान' मासिकाकडे धाडली. तीही प्रकाशित झाली. मग लेखन, प्रकाशन नित्याचे झाले. ‘उद्यान'चे संपादक ग. वि. कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनामुळे ‘श्रीमत्कालिपुराण' लेखमाला चांगली चालली. या सदरात प्रकाशित लेख ‘महात्मा बाबा' गाजला, तो सावंतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबा बाक्रे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या फिर्यादीमुळे. या प्रकरणाचा एक फायदा झाला. जरी ते लिखाण आदर्श या टोपण नावाने होत असले तरी त्याचे लेखक भटवाडीतील वि. स. खांडेकर होत, हे जगजाहीर होणे. या चर्चेने लेखक म्हणून वि. स. खांडेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले होते.
 एप्रिल, १९२० ची गोष्ट असेल. सावंतवाडीपासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावरील शिरोड्याहन घनःश्याम आजगावकर नावचे शिक्षक एक दिवस वि. स. खांडेकर यांच्या भटवाडीतील घरात दत्त झाले. त्यांना एका शिक्षकाची गरज होती. ते शिरोड्याला 'ट्युटोरियल इंग्लिश स्कूल चालवत. विशीतला हा तरुण इंग्रजी वाचतो, व्याख्यानं देतो, मासिकात लिहितो हे ते ऐकून होते. तत्पूर्वी खांडेकरांना मालवण, वेंगुर्ल्याहून अशी निमंत्रणं आली होती पण राष्ट्रीय आंदोलन, लोकमान्य टिळकांचे विचार, राष्ट्रीय शिक्षणाचा ध्येयवाद इ.मुळे खेड्यात जायचे त्यांनी यापूर्वीच निश्चित केले होते. बाबा काकांच्या निधनाने सांगलीची वाट बंद झाल्यात जमा होती. तिकडे नाणेलीत जाऊन दत्तक वडील बापूंच्या तडाख्यातून सुटायचं होतं. शिरोडे खेडे असल्याची खात्री करून घेतली. आक्का आणि काकींच्या संमतीने आजगावकर मास्तरांना होकार दिला.

 १२ एप्रिल, १९२० या दिवसानं वि. स. खांडेकरांच्या जीवनात स्वातंत्र्य व स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू केला. शिरोड्याला जाणं हे त्यांच्या दृष्टीने नव्या जीवनाची, स्वतःच्या ध्येय, स्वप्नांची नवी पहाट होती. पहाटेच त्यांनी शिरोड्याचा रस्ता धरला. मनात प्रश्नांचं काहूर होतं. ‘माझे इतर सर्व जाऊ दे; पण एक बुद्धी तेवढी माझ्यापासून जाऊ देऊ नकोस. तिची मला सोबत राहू दे' असं आर्य चाणक्याप्रमाणे मनास बजावत ते शिरोड्याला पोहोचले.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/५७