शिरोडे छोटं खेडं होतं. हजार-पंधराशेची वस्ती. अरबी समुद्राचा सुंदर किनारा लाभलेलं तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातलं गाव. आता त्याचा समावेश नव्याने झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आला आहे. रेडी, तिरोडा, आजगाव, आरवलीसारखी गावं मिळून शिरोडा पंचक्रोशी होते. तिथल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अ. वि. बावडेकर यांनी १ जानेवारी, १९१५ मध्ये ट्युटोरियल न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. अवघ्या वर्षांचं आयुष्य असलेली ही शाळा खांडेकर आले तेव्हा बाल्यावस्थेतच होती. १००-१२५ विद्यार्थी होते. बावडेकर मास्तरांनी परगावी येऊन सुरू केलेली ही शाळा. गावच्या शिक्षणाविषयी आस्था असलेली स. ग. प्रभू, आप्पा नाबर, गजानन कामत, ग. सी. खटकटे आदी मंडळ विद्यार्थी जमवायला मदत करीत. शाळेला स्वतःची इमारत नसल्याने ती तीन ठिकाणी भरे. महादेव नाबरांचे घर, कोटणीसांचे घर, बाजारातील निखग्र्याची माडी अशी शाळेची त्रिस्थळी यात्रा असायची. अ. वि. बावडेकर, घ. आ. आजगावकर, वि. स. खांडेकर, शं. प. शिनारी, भि. ना. दळवी या गुरु पंचायतानी शाळेचा संसार चालवायचं ठरलं. पण बावडेकर मास्तर येऊ न शकल्याने वि. स. खांडेकरांनाच शाळेच्या मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळणे भाग पडले.
शाळेत ते इंग्रजी,ह्रसंस्कृत, बीजगणित शिकवत. जे जे ठाऊक आहे. ते ते सांगावं या भावनेनं त्यांचं शिकवणं असायचं सांगली, पुणे इ. घाटावरची शहरं सोडू नको कोकणात आल्यावर नाणेली, बांबुळी परिसरातल दु:ख, दारिद्र्य पाहिले होते. शिरोड्याची स्थिती त्यापेक्षा वेगळी नव्हती. अठरापगड जातीचा समाज त्यांनी इथंच येऊन पहिल्यांदा अनुभवला. ‘‘पांढरपेशांच्या चार भिंतींच्या आत आयुष्यातली पहिली वीस वर्षं गेली यामुळे घरट्याबाहरे कधीही न पडलेल्या पाखराच्या पिलासारखी आपली स्थिती आहे हे या मुलांना शिकवताना माझ्या लक्षात येऊ लागलं. समाजाचा एक फार मोठा श्रमजीवी वर्ग कसा जगतो, कसा राहतो, याची सुखदु:खं काय असतात, याचं प्रत्यक्ष ज्ञान मला नव्हतचं, पण हे सारं जीवन वाङ्मयात प्रतिबिंबीत झालेलं मी पाहिलं नव्हतं. त्यामुळे माझं मन अस्वस्थ झालं. आपण अगस्ती ऋषी भले नाही होऊ, पण टिटवी होता आलं ती पुरे या अपेक्षेने मी काम सुरू केले' असे त्यांनी सांगितले होते. जग बदलायचा ध्यास त्यांनी घेतला.