पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/163

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


ही सर्व किमया निष्काम मैत्रीची.
.  खेळ व त्यातही ‘फुटबॉल' हा निवासरावांचा ‘विक पॉईंट'. मिटिंगला उशीर झाला की समजायचे आज फुटबॉल मॅच असणार. टेबल टेनिसच्या तर ते प्रतिवर्षी स्पर्धा भरवत. कै. वाय. पी. पोवार यांच्या स्मरणार्थ खेळाडूंना प्रोत्साहन हा त्यांच्या उभारीचा भाग. ऑलिंपिकपटू माणगावे मास्तरांची महाराष्ट्र शासनाने केलेली अपेक्षा निवासरावांनी त्यांना पॅको पोवार पुरस्कार देऊन भरून काढली नि मग शासनाला जाग आली! हेच कार्यकर्त्यांबाबत. सतत समाजासाठी कार्य करणा-यांबद्दल त्यांना फार बरे वाटायचे. अशा कार्यकर्त्याला अभय, प्रोत्साहन, त्यांची पाठीमागे तोंडभर स्तुती-कौतुक हा त्यांच्या उदारतेचा पुरावा.
 टेंबलाईचे शिल्पतीर्थ हे त्यांच्या अनेक अपूर्ण स्वप्नांपैकी एक. प्रत्येक मंदिराचा परिसर त्यांनी आपल्या कल्पकतेने लोकवर्दळीचा व लोकप्रबोधनाचा बनविला. टेकडीवर अपवादाने जाणारे कोल्हापूरकर आता आबालवृद्धांसह जातात ते निवासरावांच्या कल्पक, शोधक, सृष्टी निर्मितीमुळे. हे शिल्पतीर्थ पूर्ण होणे त्यास निवासरावांचे नाव देणे यासारखे त्यांचे उचित स्मारक होणे नाही. महापालिकेने मनावर घेतले तर ते अशक्य नाही. मनुष्य जेव्हा सर्वांचा होतो तेव्हा तो दुर्दैवाने स्वतःचा राहात नाही. निवासरावांचे तसेच झाले. सार्वजनिक संस्थांचा रथ ओढणाऱ्या या निगर्वी, प्रसिद्धीपराङ्मुख कार्यकर्त्याने स्वतःकडे स्वतःच्या घराकडे दुर्लक्षच केले.'आप' नि ‘परमध्ये निवासरावांनी ‘पर, ची परार्थाची, परमार्थाची,निवड केली,आपल्या लाडक्या मुलीचे लग्न तोंडावर आलेले असताही पॅको पोवार पुरस्कार वितरणासारखा घाम गाळणारा कार्यक्रम त्यांनी शिरावर घेतला खरा, पण तो जिवावर बेतला. अतिश्रम, अतिचिंता यामुळे त्यांची प्राणज्योत अकाली निमाली. त्यामुळे अनेक स्वप्ने विरली, योजना थबकल्या. कन्येचे लग्न, अनिकेत निकेतनचे उद्घाटन, वालावलकर प्रशालेची इमारत उभारणी,शिल्पतीर्थाची उभारणी, एक ना दोन,अनेक स्वप्नांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्यासारखीच स्थिती आहे.शरीर व मन गोठविणारी. डॉ. सुभाष देसाईंनी मला जेव्हा निवासरावांच्या ‘निरोपाचा निरोप दिला तेव्हा माझेही शरीर-मन वरील स्वप्नाप्रमाणे गोठले, बिथरले. आधारवड कोसळल्याने निराधार होऊन सैरभैर आकाशाचा ठाव घेणा-या पाखरासारखी स्थिती झालेले कार्यकर्ते, संस्था मी अनुभवत होतो. अंत्येष्टीच्या प्रत्यके पावलात, प्रत्यके संवादात, प्रत्येक स्वरात... न भरून येणारी आर्तता, आर्द्रता होती.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६२