अशाच एका संधीत ‘लक्ष्मीनारायण प्रसाद' या प्रासादतुल्य बंगल्यात मी पहिल्यांदा ताईंना पाहिलं, अनुभवलं ते मातृधर्मी लक्ष्मी म्हणून. हातावर चिरीमिरी देऊन त्या आमची प्रेमाने चौकशी करायच्या. एका अर्थाने आपल्याला अपत्य नसल्याचं त्या उदात्तीकरणच करत असायच्या. आम्हा सर्व मुलांवर त्यांची अपार करुणा निर्व्याज प्रेमाची पाखर सदैव असायची.
पुढे मी मोठा झालो नि रिमांड होमचे काम करू लागलो. त्या काळात बापू नि ताईंचं औदार्य जवळून अनुभवलं. बापू उदार तर ताई व्यवहारी. बापूंकडे कोण, कशासाठी, कसं येतं याची ताईंना जाण असायची. बापू भाबडेपणाने एखाद्यास देणगी, मदत देऊ लागले तर त्याला ताईंचा चाप ठरलेला. त्यात कंजूषी नसायची. कष्टाने मिळविलेले पैसे... त्याचे दान सत्पात्री असायला हवं, असं ताईचं म्हणणं असायचं! अन् ते योग्यही होतं.
नंतरच्या काळात मी वालावलकर कापड दुकान, ट्रस्ट, बालावधूत ट्रस्टचा विश्वस्त झालो. ताईंशी आणखी घनिष्ठ संबंध आला. तो काळ १९८०-८५ चा असावा. मिल बंद होऊन तिथं बालावधूत मंदिर व धर्मशाळा सुरू होती. तीही बंद पडल्यात जमा होती. इतकी मोठी वास्तू पडून राहू नये असं नलिनीताईंना वाटायचं. त्यातून मग आम्ही नवा ट्रस्ट स्थापन केला, तो नलिनीताईंच्या नावानेच.सौ. नलिनी शां.पंतवालावलकर धर्मादाय विश्वस्त निधी स्थापून आम्ही धर्मशाळेचं रूपांतर धर्मादाय रुग्णालयात केलं. १९८६ पासून अत्यल्प दरात कोल्हापुरात सुरू असलेली रुग्णसेवा ही नलिनीताईंच्या कल्पनेचे अपत्य आहे. वालावलकर कापड दुकान ट्रस्टच्या फायद्यातून चालणारं हे कार्य म्हणजे विश्वस्त निधीतून चाललेलं अधिक व्यापक समाज कार्य होय.
नलिनीताईंनी आपल्या भावांच्या मुलांना आपली मुलं मानली. सतीश,उदय नि दीपक या तिघांचं लालन-पालन, शिक्षण, संस्कार, विवाह,व्यापार सर्व ताईंनी केलं. ते पोटच्या गोळ्यापेक्षा अपार मायेनं. बापूंनी सामाजिक संस्कार सांभाळला नि ताईंनी घर सांभाळले. ताईंना स्वच्छता, नीटनेटकेपणा, नियमितपणा याचं मोठं वेड. गैर त्यांना खपायचं नाही. एखाद्या माणसास आपलं म्हटलं की त्याला त्यांनी आजन्म जपलं, जोपासलं म्हणून समजा.
पैशावर सारं विकत घेता येतं असा समज आज सर्वत्र पसरलेला आढळतो. पण पैशापेक्षा कष्टाचं, त्यागाचं, समर्पणाचं मोल अधिक असतं हे ताई जाणून होत्या.
पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/158
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५७