पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशाच पण या सर्वांमागं एका करुणेच्या कल्पतरूमागं एक सतत धडपडणारी, कर्तव्यकठोर व सदैव स्थितप्रज्ञ राहणारी सावली होती, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
 १९३४ मध्ये शा. कृ. पंत वालावलकर यांचा विवाह नलिनीताईंशी झाला. त्या मूळच्या मालवणच्या. सामंत-नेवाळकरांचं घर हे त्यांचं माहेर. तिथं भाड्याचं दुकान थाटून संसार केलेल्या नलिनीताईंना दूरदृष्टी होती. त्या वेळचं कोकण म्हणजे कोल्हापूरची उतारपेठ. कोकणात पडतरीत व्यापार करावा लागायचा. माया फार सुटायची नाही. घाटावर गेलो तर व्यापार वाढले नि मायाही. झालंही तसंच. आज भाऊसिंगजी रोडवर जिथं बनाजी मुकुंदशेठ वेल्हाळ म्हणून कापड दुकान आहे तिथं पूर्वी वालावलकरांचं कापड दुकान होतं. तिथं व्यापार वाढला, जागा अपुरी पडू लागली म्हणून मग पुढे आजची लक्ष्मीरोड वरील पारगावकर बिल्डिंग मधील जागा घेतली. त्या जागते पूर्वी बँक ऑफ कोल्हापूर होती. ती कोल्हापुरातील पहिली संस्थानकालीन बँक. ती बुडाली. (पतसंस्था बुडल्या म्हणनू आश्चर्य नको, परंपरा जुनीच आहे.) ही जागा निवडण्याची दूरदृष्टी नलिनीताईंची...
 नलिनीताईंनी व बापूंनी मिळून नुसता संसार केला नाही तर व्यापारउद्योगही केला. लक्ष्मीरोडवरचं ताईंचं दुकान १९४३ मध्ये सुरू झालं. तो काळ व्यापार- उद्योगाच्या दृष्टीने मंदीचा काळ होता. दुसरं महायुद्ध झालेलं. जागतिक मंदी आलेली. भारतात ‘भारत छोडो' आंदालनानं तीव्र रूप धारण केलेलं होतं. साखर नि कापडाचा काळाबाजार सुरू झालेला. कापड तर चक्क रेशनिंगनं मिळायचा तो काळ, नवीन दुकान सुरू झालं आणि मंदीचा फटंका. कापडाच्या गाठीचं गोणपाट व सुतळ्या इतक्याच फायद्यावर व्यापार करणं अशक्य म्हणून ताईंनी-बापंनी इचलकरंजीत चक्क कापडाची मिलच सुरू केली. त्या वेळी हा व्यवसाय गुजर-मारवाड्यांचाच मानला जायचा. त्या काळात वालावलकर दांम्पत्याने ही मिल सुरू करून मोठं धाडस दाखवलं. ताई दुकान व मिल दोन्ही सांभाळायच्या. पुढे ही कसरत झेपेना म्हणून ती मिल कोल्हापुरात आणली. आज जिथे वालावलकर हॉस्पिटल आहे तिथं पूर्वी पत्र्याची शेड होती. त्या शेडमध्ये नलिनी वीव्हिंग मिल चालायची.
 १९६० च्या दरम्यान मी कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये एक अनाथ मुलगा म्हणून दाखल झालो होतो. त्या काळात रिमांड होममध्ये गुलाबाची मोठी बाग होती. गुलाबाची फुलं वालावलकरांच्या घरी देवपूजेसाठी पाठविली जायची. हिरवी अॅम्बेसिडर गाडी येऊन ती फुलं घेऊन जायची. कधी-मधी काही मुलांना त्या गाडीतनू फुलं घेऊन जाण्याचा चान्स मिळायचा.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५६