पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/154

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जैनसेवी संघटक : बी. बी. पाटील

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf

 बी. बी. पाटील आपले अनुभव पाथेय एक सामाजिक दस्तऐवज म्हणून लोकार्पण करत आहेत. ‘माझे सामाजिक कार्य : एक दृष्टिक्षेप' अशा नावाने त्यांनी लिहिलेलं एक आत्मकथन प्रकाशित होत आहे. काळोखाच्या ग्रहणांनी ग्रासलेल्या समाजजीवनात परत एकदा सदाचाराचं चांदणं शिंपलं जावं म्हणून त्यांचा हा प्रयत्न होय.
 घरची समद्धी असली तरी ज्ञानाच्या समद्धीने त्या वेळच्या तरुणांत कायाकल्प घडवून आणला, याचे उदाहरण म्हणजे बी. बी. पाटील यांचे जीवन. पारंपरीक पाटिलकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचं शिक्षित होणं याला त्या वेळी एक आगळी प्रतिष्ठा होती. राजकारण व समाजकारण अशा दुहेरी मार्गांनी समाजोन्नती साधली. अशा कार्यकर्त्यांपैकी बी. बी. पाटील एक होत.

 बी. बी. पाटील यांनी नगरसेवक म्हणनू आपल्या समाजकारणाची सुरुवात केली. त्यांनी गल्लीपासून आख्ख्या नगराला आपल्या कार्याने प्रभावित केले नि ते नगराध्यक्ष झाले. त्या वेळी कोल्हापूर महापालिकेची आर्थिकस्थिती बिकट होती. उत्पन्न कमी नि खर्च मोठा. बी. बी. पाटील यांनी जकात वसुली नेटाने करून महानगरपालिका समद्भू केली. वसुली वाढवून आलेल्या उत्पन्नातून त्यांनी या शहरात प्राथमिक शाळांचं जाळं विणलं. त्यामुळे तेथील बहुजन समाज शिक्षित होणं शक्य झालं. त्या वेळी या शहरावर शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं. त्यांनी पक्षाचे चिटणीस असताना शहरातील व जिल्ह्यातील अधिकांश लोकप्रतिनिधी निवडून आणले.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५३