पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आणलं. पुढचं आयुष्य कसं काढावं, हा तिचा सवाल होता. एका मुलीला लग्नानंतर सहा-सात महिन्यातच नवऱ्याचं घर सोडावं लागलेलं. आपल्या भावाच्या सांगण्यावरून तिचा नवरा तिला खूप मारहाण करायचा. आता ती माहेरीच राहते. अशा बालविधवा, बालपरित्यक्ता पुढचं आयुष्य कसं जगणार? सोळाव्या वर्षी लग्न झालेली एक मुलगी पोलिसात भरती होण्याचं आपलं स्वप्न कसं कुरतडलं गेलं, हे उपस्थितांना सांगू लागली. पुढे हीच मुलगी जेव्हा राज्य बालहक्क आयोगासमोर उभी राहिली, तेव्हा ती एकोणीस वर्षांची होती आणि दुसऱ्यांंदा गर्भवती होती; पण भरती होण्याचं स्वप्न टिकून होतं. पुढच्या वर्षी आपण भरती होणारच, हा निर्धार तिनं बालहक्क आयोगासमोर व्यक्त केला आणि उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांंकडून त्यासाठी सहकार्याचे आश्वासनही तिनं मिळवलं.

 पथनाट्य सादर झाल्यावर मोठी बैठक झाली. विजया रहाटकर यांनी सगळ्या अधिकाऱ्यांंशी बातचित केली. परंतु नंतर लवकरच विभागीय आयुक्तांची बदली झाली आणि या बैठकीतली चर्चा बऱ्याच अंशी कुचकामीच ठरली. आम्ही आमचं काम इमाने इतबारे केलं होतं. आता थांबून चालणार नव्हतं. मुलींना त्यांच्या हक्काची जाणीव झाली होती. दबलेपण बाहेर पडू लागलं होतं. एका मोठ्या लढाईला तोंड फुटलं होतं आणि स्थानिकांच्या सहकार्याने, त्यांना समजून घेऊन, समजून सांगून ही लढाई सुरूच ठेवायची होती.


कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf
६९