पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



दहा

 


 आरोग्य विभागातल्या आशा कार्यकर्त्या आपल्याच कामाबद्दल अनभिज्ञ असतात. हे काम सरु करतानाच आम्हाला दिसून आलं होतं. वास्तविक परिसरातल्या मुलींचे गट तयार करणं. त्यांना आरोग्य विषयक आणि अन्य माहिती देणं खरंतर बंधनकारक आहे पण त्याची माहितीच आशांना असत नाही. आम्ही त्यांच्या सोबत खूप पूर्वीपासून काम करत असल्यामुळे आमच्या तारा जुळल्या होत्या. जिल्ह्यात एकूण १२० आशा कार्यकर्त्या. प्रत्येक तालुक्यातलं काम तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली चालणं अपेक्षित. आमच्या पुढाकारानं आशांनी खरोखर मोठी कामगिरी केली. गावोगावी मुलींचे गट बांधले. काही गावांमध्ये तर दोन-तीन गट झाले. तीस ते पस्तीस आशांच्या कामावर देखरेख करायला एक गटप्रवर्तक नेमून मोट बांधली. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेश तांदळे यांनी आशांचं संपूर्ण संचालन आमच्या हाती सोपावलं. प्रत्येक गटात २० मुली, या हिशोबनं २४०० मुलींचा सहभाग अपेक्षित होता. प्रत्यक्ष नोंदणी झाली सुमारे ३५०० मुलींची आणि त्यातल्या २५६२ मुली प्रत्यक्ष सक्रीय ही झाल्या. या सगळ्या मुली आजही आमच्या संपर्कात आहेत. गटांची नांवे ठरली, नियमावली ठरली, रेकॉर्ड तयार होऊ लागलं, संपूर्ण प्रक्रियेला औपचारिक रुप येऊ लागलं. मुलींसाठी अभ्यासक्रम तयार केला. कमला भसीन यांच्या पुस्तकाचे मराठी भाषांतर केलं. ‘ओळख स्वत:ची - संवाद माझा माझ्याशी' असं त्याला नाव दिलं. १५ दिवसांतून एकदा प्रत्येक गटाची बैठक होऊ लागली. दहा गावांत म्हणजे ५० गटांत एक असे किशोरी मित्र नेमले गेले. ही मधली फळी. त्यांच्यावर देखरेखीसाठी साधनव्यक्ती, अशी साखळी तयार झाली.

६४