पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असलेला. जन्माआधीच मुलींच्या जिवावर उठणाच्या आणि वैद्यकीय पेशाला कलंक लावणाच्या डॉक्टरांवर आम्ही कसं जाळं टाकतो, हे त्यानं पाहिलेलं. त्यानं दिलेल्या माहितीनुसार खरोखर सगळंकाही अगदी उघडचाललंय, याचा अनुभव आम्हाला फोनवर बोलताना आलेला. त्यानंच दवाखान्यांचे नंबर मिळवलेले. आम्ही लँडलाइनवरून फोन केले होते. “मुलगा आहे की मुलगी, हे तपासायचंय,” असं चक्क २००७ मध्ये आम्ही फोनवरून उघडपणे बोलू शकलो होतो आणि पलीकडून भरभरून प्रतिसादही मिळाला होता. एकाच दिवसातल्या तब्बल आठ दवाखान्यांच्या अपॉइन्टमेन्ट्स - त्याही खुद्द बीड शहरातल्या - मिळवण्यात आम्हाला यश आलं होतं आणि आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात अपरिचित अशा या स्टिंग ऑपरेशनच्या भवितव्याची धास्ती घेऊन आम्ही सर्व प्रकारच्या अंधारातून धावत होतो....आजपावेतो केवळ नकाशावरच पाहिलेल्या बीडच्या दिशेनं...
 पंढरपूरमार्गे बीडच्या सर्किट हाउसवर पोहोचलो, तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. धाकधूक उशाला घेऊनच झोपले सगळे आणि सकाळी दवाखाने उघडायच्या वेळेपर्यंत आवरून तयारही झाले. अनोळखी गाव. कुणीच ओळखीचं नाही. पण 'अशा' ठिकाणांचे पत्ते रिक्षावाले अचूक सांगतात, हा आजवरचा अनुभव. डॉ. सानप यांच्या भगवान हॉस्पिटलचा पत्ताही एका रिक्षावाल्याकडूनच मिळाला. “फार लांब नाही; चालतच सोडतो," असं म्हणून तो आम्हाला हॉस्पिटल दाखवायला आला. डॉ. सानप यांचं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी समोर. म्हणजे, ज्या सिव्हिल सर्जनने नियमबाह्य गोष्टींवर देखरेख करणं अपेक्षित असतं, त्यांच्या अगदी डोळ्यासमोर! डॉक्टरांची वाट बघत काही पेशंट बसलेले; पण डॉक्टर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात गुंतलेले. अनोळखी गावात आमच्या कामाचा श्रीगणेशा गणेश चतुर्थीलाच होत होता.
 

 आमच्यापैकी प्रत्येकाची कामं नेहमीप्रमाणं ठरलेली होती. सगळ्यांनी वेड पांघरून पेडगावला जायचं. काम फत्ते होईपर्यंत कुणी कुणाला ओळखसुद्धा द्यायची नाही. योग्य वेळी स्थानिक मीडियाला माहिती देण्याचं काम कैलासचं. प्रशासनातल्या अधिका-यांना माहिती देणं आणि पुढचे सोपस्कार करणं ही माझी जबाबदारी. तपासणी होईपर्यंत दवाखान्यातलं सगळं काम कुशलतेनं हाताळण्याचं काम शैलाताईंचं. बबलू, माया जणू आमच्याबरोबर नसल्यासारखेच. आमच्याकडे न पाहता परिस्थितीवर बारकाईनं नजर ठेवणारे. बाहेर गणपतीच्या मिरवणुकांचे आवाज, गुलालाची उधळण, बँडचे आवाज सुरू झालेले.