Jump to content

पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गणपतीची पूजा आटोपून डॉक्टर बनियन आणि हाफ पँटवरच घरातून दवाखान्यात आले. बरेच पेशंट बसलेत हे बघून गणेश चतुर्थीला 'लक्ष्मी' घरी चालून आल्याचे प्रसन्न भाव त्यांच्या चेह-यावर. कविताची सोनोग्राफी केली. 'मुलगाच आहे; पण खात्री करून घेऊ,' असं म्हणाले. या बाबतीतही डॉक्टर 'सेकंड ओपिनियन' घेतात हे आम्हाला नवीनच होतं. धाकधूक वाढत होती आणि डॉ. सानप यांनी ओपिनियनसाठी बोलावलेल्या व्यक्तीला बघून तर आम्ही चाटच पडलो. चक्क सिव्हिल हॉस्पिटलमधले रेडिओलॉजिस्ट सय्यद यांनाच त्यांनी बोलावून घेतलं. पुन्हा सोनोग्राफी झाली. 'मुलगाच आहे,' यावर त्यांचंही शिक्कामोर्तब झालं. निम्मं काम झालं होतं. आता कारवाईसाठी सिव्हिल सर्जनना बोलवायचं आणि हे सगळं गोपनीय ठेवून उरलेल्या सात अपॉइन्टमेन्ट्स आजच पूर्ण करायच्या.
 
 सिव्हिल सर्जनच्या घरीही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सुरू होती. आम्ही सगळे आरतीला उभे राहिलो. त्यानंतर त्यांना आमची ओळख सांगून घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा 'कसला रे बाबा विघ्नहर्ता!' असं म्हणून कपाळावर आठ्या घेऊन ते आमच्यासोबत निघाले. दरम्यान, तोपर्यंत पत्रकारांना या प्रकरणाचा कसा सुगावा लागला कुणास ठाऊक! एकेक करून तब्बल साठ पत्रकार डॉ. सानपांच्या दवाखान्यात जमले. खरं तर आठही स्टिंग ऑपरेशन एकाच दिवशी करून मीडियाला एकदम माहिती द्यायची असं आमचं ठरलं होतं. आम्ही सिव्हिल सर्जनना घेऊन डॉ. सानप यांच्या दवाखान्यात पोचलो तोपर्यंत डॉक्टर दवाखान्यातून पुन्हा घरात गेले होते. पण प्रसूतीसाठी एक महिला अॅडमिट होती आणि ती कळाही देऊ लागली होती म्हणून डॉक्टर पुन्हा दवाखान्यात आले. त्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर कारवाईत सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन ते प्रसूतीसाठी आत गेले.
 

 इकडे बाहेरच्या कक्षात पत्रकारांनी आमच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती. फोटो काढणं, शूटिंग वगैरे सुरू केलं होतं. या सगळ्या गदारोळात आम्ही डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत होतो. पंधरा मिनिटांनी मी कानोसा घेतला, तेव्हा पेशंट महिलेच्या कळांचे आवाज येईनासे झाले होते. आतून कुठलाच आवाज येत नव्हता. संशय येऊन आम्ही आत गेलो, तेव्हा तिथं कुणीच नव्हतं. खिडकीतून आम्ही बघितलं, तेव्हा जवळच्या मैदानातून डॉ. सानप पळताना दिसले...