पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८ । केसरीची त्रिमूर्ति

मिल्ल, डॉ. विल्सन यांवर आम्हीं टीका केली तर तें महापातक असें त्यांना वाटतें. याचा अर्थ असा की, पूर्वी मनाचें स्वातंत्र्य नव्हतें म्हणूनच आपल्याकडे टीका- वाङमय झालें नाही. मल्लीनाथासारखे टीकाकार झाले, पण ते शब्दार्थ, व्याकरण यापलीकडे कधी गेले नाहीत. त्यामुळे काव्याचे हृदगत् विशद करून त्याची परखड गुणदोष- चिकित्सा करणें हें पूर्वी कधी झालें नाही 'संस्कृत कविता' या निबंधांत विष्णुशास्त्री लिहितात, "सुमारे तीनशे वर्षापूर्वी युरोप खंडांत ज्याप्रमाणे ॲरिस्टॉटल याच्या ग्रंथांचे प्राबल्य असे व त्यांत यत्किचितहि दोष काढणें म्हणजे केवळ पातकच, असें लोक मानीत असत त्याचप्रमाणे आपल्या देशांतील पंडितांची देखील कवि, शास्त्रकार, इत्यादींविषयी समजूत असावी असें दिसतें. मिल्टन, ड्रायडन, बेकन इत्यादि महान् ग्रंथकारांविषयी इंग्रेज ग्रंथकार अगदी निर्भीडपणें जो अभिप्राय देतात तो वाचून, आमच्या देशांतील पंडितांच्या तर अंगावर खरोखर काटा उभा राहील !"
 तेव्हा पाश्चात्त्यांप्रमाणे टीका- वाङमय येथे निर्माण न होण्याचें कारण, शास्त्रीबुवांच्या मतें, शब्दप्रामाण्य-बुद्धि किंवा विचारस्वातंत्र्याचा अभाव हेंच होतें हे यावरून दिसून येईल. 'भाषापद्धति' या निबंधांत विनोदात्मक लिहिण्याची प्रवृत्ति मराठींत किंवा संस्कृतांत पूर्वी नव्हती, हा विचार त्यांनी मांडला आहे. मात्र त्याची कारणमीमांसा त्यांनी कोठेच केलेली नाही. पण ती केली असती तर हेंच कारण त्यांनी दिलें असतें. कारण विनोद ही कोणत्या ना कोणत्या व्यंगावर टीकाच असते.