क्ष-किरणें । ६७
व्याधी आम्हांला जडल्या, असें म्हटलें तरी चालेल. याच पुराणप्रेमी वृत्तीचे, पुढे डॉ. जॉनसन यांची चरित्रासाठी कां निवड केली, हें सांगतांना, शास्त्रीबुवांनी वर्णन केलें आहे. सर्वसाधारणपणें लोकांना अद्भुत पराक्रम करणाऱ्या लोकांचीं, चमत्कार करणाऱ्या संतांची चरित्रें हवीं असतात. ज्ञानेश्वर, नामदेव, भक्त प्रल्हाद, सती सावित्री यांच्या चरित्रांत चमत्कार असतात. म्हणजे तीं चरित्रे हीं पुराणेंच असतात. म्हणून ती लोकांना आवडतात. तीं सोडली तर शिकंदर, कोलंबस, वॉशिंग्टन यांची चरित्रे ते वाचतील. यांत दैवी चमत्कार नसले तरी अद्भुत पराक्रम असतात; आणि लोकांना ते पराक्रम दैवी आहेत, असेंच वाटत असतें. अशा लोकांविषयी शास्त्रीबुवा म्हणतात, "चरित्रांच्या वाचनापासून होणारा वास्तविक फायदा, त्यांस बिलकूल कळलाच नाही, असें म्हटलें पाहिजे."
वास्तवाची अभिरुचि
हेच खरें आहे. मानवाचीं चरित्रे त्यांना नकोच असतात. आपल्याकडे इतिहास-लेखन कां झालें नाही, हें सांगतांना विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे की, आपल्या लोकांना नरस्तुति गाण्याचा कंटाळा होता. हें त्यांचे निदान अगदी बरोबर आहे. डॉ. जॉनसन याच्या चरित्रापासून काय मिळणार ? संसारास व लोकव्यवहारास सदुपदेश प्राप्त होतो, तसा सार्वभौम राजांच्या लढायांपासून होणार नाहीं- असें शास्त्रीबुवा म्हणतात. हिंदी जनांना लोकव्यवहाराची चिंताच नव्हती. संसाराची काळजीच नव्हती. कारण तो मायामय असून क्षणिक आहे. चिरंतन आहे तो परमार्थ. तो पुराणांतील व्यक्तींच्या चरित्रांत आढळतो ! म्हणून येथे पुराणें व तत्सम चरित्रे शेकड्यांनी झाली. लोकव्यवहारास उपयुक्त अशीं चरित्रें झालींच नाहीत. त्यांची म्हणजे वास्तवाची अभिरुचि निर्माण करावी म्हणून तर विष्णुशास्त्री यांनी जॉनसनचें चरित्र लिहिलें.
शब्दप्रामाण्य
विद्येची अभिरुचि नाही, हें जसें फार मोठें व्यंग तसेंच वास्तवाची अभिरुचि नाही, हेंहि फार मोठें घातक व्यंग होय. हिंदुस्थानांत प्राचीन काळांत उत्तम टीका-वाङमय नाही, ग्रंथांचें परीक्षण नाही हें सांगतांना अशाच आणखी एका व्यंगाचा त्यांनी निर्देश केला आहे. प्राचीन काळी हिंदुस्थानांत इतिहासरचना नव्हती, चरित्र- लेखन नव्हतें, त्याचप्रमाणे, ग्रंथावर टीका हा प्रकारहि म्हणण्यासारखा नव्हता, असें 'ग्रंथावर टीका' या निबंधांत विष्णुशास्त्री म्हणतात. याचें कारण काय ? शब्दप्रामाण्य-बुद्धि ! हें तिसरें मोठें व्यंग होय. विष्णुशास्त्री यांनी या शब्दांत तें मांडलेलें नाही; पण त्यांचा भावार्थ तोच आहे. ते म्हणतात, "आपणांहून जे थोर आहेत त्यांचे दोष काढण्याचा अधिकार आपणांस नाही, अशी मागे समजूत होती." यानंतर पुढे नव्या विद्वानांविषयी लिहितांना ते म्हणतात की, "आतासारखें मनाचें स्वातंत्र्य पूर्वी कधी नव्हते, असे इंग्रज सरकारचे पोवाडे हे नवे विद्वानच गातात; आणि मेकॉले