-९-
क्ष-किरणे |
अंतमुख
'आमच्या देशाला कांहीहि झालेले नाही' हें विष्णुशास्त्री यांचे निदान टिकण्याजोगे नाही; त्याचप्रमाणे त्यांनी हिंदुस्थानच्या अवनतीची केलेली मीमांसाहि अनेक हेत्वाभासांनी भरलेली आहे, हे आपण गेल्या दोन लेखांत पाहिले; पण तेथे हेंहि सांगितलें आहे की, कोणत्याहि कारणांनी त्यांनी वरील प्रकारे अयथार्थ निदानें केली असली तरी स्वदेशाच्या व्यंगांकडे, दोषांकडे, प्राचीन परंपरेंतील वैगुण्यांकडे, आणि स्वजनांच्या प्रमादांकडे ते चिकित्सक दृष्टीने पाहूच शकत नव्हते हें खरें नाही. निबंधमालेतील लेखांतच त्यांनी अंतर्मुख दृष्टि करून प्राचीन परंपरेंतील, हिंदु धर्मातील अनेक दोष दाखवून त्यांवर परखड टीका केली आहे. इतकेंच नव्हे, तर वर जीं त्यांचीं अयथार्थ निदानें म्हणून सांगितलीं त्यांहून बरीच निराळीं अशीं निदानें शेवटच्या शेवटच्या 'केसरी'तील लेखांत त्यांनी केली आहेत, असें आपल्याला आढळते. त्यांनी हें जें आत्मनिरीक्षण केलें आहे त्याचा आता विचार करावयाचा आहे.
जीवितकार्य
पण त्याहि आधी एक गोष्ट निदर्शनास आणावयाची आहे. ती ही की, विष्णुशास्त्री यांचें खरें कार्य म्हणजे या देशाचा तेजोभंग करणाऱ्या इंग्रज राज्यकर्त्यांना, पंडितांना आणि मिशनऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने जहरी उत्तर देऊन येथील लोकांचा स्वत्वाभिमान जागृत करणें हें होतें. त्यांनी नवयुग निर्माण केलें तें या अर्थाने. इंग्रजी राज्याचें अंतरंग जाणून ते राज्यकर्ते स्वार्थी, लुटारू व दुष्ट प्रवृत्तीचे आहेत हें ध्यानीं घेऊन त्यांनी या देशाला घातलेल्या दास्यशृंखला तोडून टाकल्या पाहिजेत व त्यासाठी