अवनतीची मीमांसा । ६१
दार नाही काय? आमच्या फौजा युरोपच्या मैदानावर पुष्कळदा युरोपीयांनाहि भारी ठरत असतांना, तें शौर्य स्वदेशरक्षणासाठी उपयोगी पडूं नये, यावरून या देशांत स्वदेशाभिमान, स्वधर्माभिमान शून्यावर येऊन ठेपला होता असा अर्थ होत नाही काय ? आणि हा अभिमान हें तर क्षात्र धर्माचें मुख्य लक्षण.
आमची बुद्धिमत्ता
आमची बुद्धिमत्ता वेदकालाइतकीच आजहि प्रखर आहे, असें विष्णुशास्त्री म्हणतात, आणि इंग्रजी विद्येचें अध्ययन आमच्या लोकांनी अतिशय जलद केलें, जो विषय हाती घ्यावा त्यांत ते पारंगत होतात, हें प्रमाण देतात. हें खरें आहे, पण ती इंग्रजी विद्या- म्हणजे रसायन, पदार्थविज्ञान, भूविज्ञान, जीवशास्त्र, भूगोल- खगोल शास्त्र, भाषा, विज्ञान, विद्युत्शास्त्र ही विद्या- निर्माण करण्याचें जें सामर्थ्यं पूर्वी आमच्या ठायीं होतें तें आता सर्वस्वीं लुप्त झालें होतें, आणि ह्या सर्व भौतिक विद्या इंग्रज आम्हांला शिकवतील तेव्हा आम्हांला अवगत होणार अशी जी अवस्था आली तीवरून बुद्धिमत्तेच्या दृष्टीनेहि हिंदी जनांना अवकळा आली होती असेंच ठरत नाही काय ?
तेव्हा अगदी मूलभूत शौर्य- धैर्य किंवा बुद्धिमत्ता हे गुण जरी हिंदी लोकांच्या ठायीं असले तरी अनेक शतके ते क्षीण व निर्जीव होऊन गेले होते असेंच म्हटलें पाहिजे. आणि शब्दप्रामाण्य, जिज्ञासाशून्यता, परमार्थप्रवणता, संशोधनावर येणारी नाना तऱ्हेची बंधनें, प्रवासावर येणारी जातीय बंधनें हींच त्याची कारणें होत असें म्हणण्यावांचून गत्यंतर नाही.
आमचें शौर्य-धैर्य कायम आहे, आमची बुद्धिमत्ता आजहि वेदकालाइतकीच प्रखर आहे, पण आमच्या या गुणांना अवसर न मिळाल्यामुळे ते प्रगट होत नाहीत, असें म्हणणें आणि ते गुण लोपले आहेत असें म्हणणें, हें सारखेच आहे. विक्रमादित्य, शिवछत्रपति, शंकराचार्य, रामदास, तुकाराम, तात्या टोपे यांना काळ अत्यंत प्रतिकूल होता; पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाला, शौर्याला, बुद्धिमत्तेला स्वतःच अवसर मिळविला. असा अवसर जेव्हा देशांतील लोकांना मिळवितां येत नाही तेव्हा समाजाचा अधःपात झाला आहे, असेंच म्हटलें पाहिजे; आणि तो अधःपात धर्माला अवकळा आल्यामुळे, सामाजिक न्याय नष्ट झाल्यामुळे, बुद्धिवाद लोपल्यामुळेच झालेला असतो, असेंच प्रत्येक देशाच्या इतिहासावरून दिसून येतें.
पण या बाबतींत इतिहासांतलीं वा अन्य ग्रंथकारांच्या ग्रंथांतली प्रमाणें देण्याची गरजच नाही. कारण स्वतः विष्णुशास्त्री यांनीच अन्यत्र तशी मीमांसा केली आहे. त्यांची दृष्टि झाकोळते तेव्हा ते सनातन धर्माचा व प्राचीन परंपरांचा असमर्थनीय अभिमान घेऊन उठतात. पण इंग्रजी विद्येचें वज्र त्यांच्या हाती असलें म्हणजे त्यांचा विवेक नेत्र उघडतो. आणि मग ते पूर्ण तटस्थपणें स्वजन दोषांकडे पाहू शकतात. या क्ष-किरणांतून त्यांना काय दिसतें तें आता पाहूं.