पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनावरचे दोन ताण । ५१

अस्वस्थ होतें. इंग्रजी विद्या शास्त्रीबुवांना किती महत्त्वाची वाटत असे, तें मागे सांगितलेंच आहे. लोकहितवादी यांनी तिचें तसेंच गुणगान केलें आहे. ते म्हणतात, "इंग्रजांच्या विद्या हिंदूस अश्रुत आहेत. याजकरिता सर्वांनी त्यांतील ज्ञान घ्यावें. सांप्रत इंग्रजीत ज्या विद्या, भूगोल, खगोल, राज्यनिति इत्यादि आहेत त्यांचा विचार करावा, त्यावांचून लोकांस कोणतेंहि कार्य नीट करतां येणार नाही." ('पत्र', ६९). पत्र क्र. ९५ यांत लोकहितवादींनी आपले शास्त्री पंडित, रसायनशास्त्र, यंत्रज्ञान, शिल्पज्ञान यांवरील ग्रंथ पाहत नाहीत म्हणून त्यांना दोष दिला आहे. याच अनुषंगाने ग्रंथरचनेचें माहात्म्यहि लोकहितवादींनी विष्णुशास्त्री यांच्याइतकेंच पोटतिडिकीने सांगितलें आहे.
 विचारस्वातंत्र्यहि लोकहितवादींना विष्णुशास्त्री यांच्याइतकेंच महत्त्वाचें वाटतें. "मनूचें वचन असो, याज्ञवल्क्याचें असो, कोणाचेंहि असो. ब्रह्मदेवाचें का असेना, 'बुद्धिरेव बलीयसी' असें आहे. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धि चालवा. प्राचीन काळीं ऋषि विचारशील होते. त्यांनी नक्षत्रे पाहून, औषधे शोधून ग्रंथ बुद्धिबळाने लिहिले; पण त्यानंतर लोकांस समजूत पडली की, ते ऋषि देवावतार होते. तेव्हा आपला धर्म इतकाच की, त्यांनी जें करून ठेविलें तितकें मात्र शिकावें. त्याजवर नवीन कल्पना काढू नये. काढली तर देवांचा अपमान होतो. अशी समजूत पडून लोक अगदी मूर्ख झाले."- असे विचार त्यांनी ठायीं ठायीं मांडले आहेत. 'ग्रंथावर टीका' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी हीच वृत्ति प्रगट केली आहे. "आपणांहून जे थोर आहेत त्यांचे दोष काढण्यास आपणांस अधिकार नाही, अशी भाविक लोकांची समजूत आहे. पण सूर्यावरचे डाग पाहूं नयेत, किंवा चंद्रास कलंकी म्हणू नये असे म्हणण्यासारखेंच हें असमंजस होय. थोरांचे दोष दाखविले तर त्यांचा उपमर्द होतो ही अगदी खोटी समजूत आहे."- असे त्यांनी स्वच्छ सांगितलें आहे.
भटभिक्षुक
 जुने शास्त्री-पंडित यांना विद्याभिरुचि मुळीच नाही हा जो विष्णुशास्त्री यांचा अभिप्राय तोच लोकहितवादींनी निरनिराळ्या पत्रांत प्रगट केला आहे. भट, भिक्षुक, यांच्याविषयी तर ते फारच भरड व थोड्या असंस्कृत भाषेत लिहितांत. विष्णुशास्त्री यांना त्याचा फार राग येतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, संपत्तीचा योग्य उपभोग कोणता तें सांगतांना त्यांनी भावार्थाने तसेंच लिहिलें आहे. ते म्हणतात, "यापूर्वी ब्राह्मणांची, विशेषतः भटांची सर्वथा भर करण्यांत लोक पुण्य मानीत; पण आता समदृष्टीने पाहतां सर्व विपन्न मनुष्यें धर्मास सारखींच सत्पात्र आहेत, अशी उत्तम समजूत पहिलीच्या जागी आली." खरा धर्म कोणता तें सांगतांना लोकहितवादी म्हणतात, "आंधळ्यास जेवावयास घातलें काय ? दीन-गरिबांस (ब्राह्मणांस नव्हे) वस्त्रे दिलीं काय ? अज्ञानास ज्ञानी केलें काय ?- हें पाहवें. धर्म त्यावरून ठरतो." ('पत्र', ३५).