५० । केसरीची त्रिमूर्ति
भोक्ते, पुरस्कर्ते होते. व्यक्ति हे अंतिम मूल्य ते मानीत. समता, बंधुता यांचा तर ते पावलोपावलीं उपदेश करीत. तरीहि चातुर्वर्ण्य ही श्रेष्ठ समाजरचना आहे, असें ते म्हणत. "आणि आत्म्याच्या विकासासाठी सहभोजन व मिश्रविवाह यांवर बंदी घालणें अवश्य आहे," असें सांगत. ('यंग इंडिया', ६, १०, २१). या विसंगतीचा अर्थ कसा लावायचा? पंडितजीहि लोकशाहीचे उपासक होते; पण दंडायत्त कम्युनिस्ट देशांवर त्यांचें फार प्रेम. आणि रशिया व चीन आपल्या जवळच्या राष्ट्रांवर प्रत्यहीं आक्रमण करून साम्राज्य- विस्तार करीत आहेत हें डोळ्यांनी ते पाहत असतांनाहि, कम्युनिस्ट राष्ट्रें आक्रमक असणें शक्य नाही, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. यामुळे चीनविषयी ते गाफील राहिले इतकेंच नव्हे, तर त्याने आक्रमण केल्यावरहि ते त्याला आक्रमण म्हणेनात. विष्णुशास्त्री यांचे, किंवा कोणत्याहि थोर पुरुषाचें मूल्यमापन करतांना, मानवाची ही अपूर्णता आपण सतत ध्यानांत ठेविली पाहिजे.
सहानुभूतिशून्य
त्यावेळी हिंदु धर्माला अत्यंत विकृत रूप आलें होतें. विषमता, जुलूम, अन्याय, पक्षपात यांचा तो पुरस्कार करीत असे. अनंत जाति-उपजाति तशाच राहिल्या पाहिजेत असें त्याचें शास्त्र होतें. 'धारणात् धर्मइत्याहु: ।' 'अभ्युदय व निःश्रेयस प्राप्त करून देईल तो धर्म' या व्याख्यांशी त्याचा कसलाहि संबंध राहिलेला नव्हता. असे असूनहि लोकशाहीच्या यशासाठी या धर्मांत फार मोठें परिवर्तन घडविलें पाहिजे, असें विष्णुशास्त्री यांना वाटले नाही. या परिवर्तनाला किंवा सुधारणेला आमचा विरोध नाही, इतकेंच ते म्हणत. पण त्या धर्मामुळे भारताची अवनति झाली आणि उन्नतीसाठी, लोकायत्त शासनासाठी, जातीय विषमता, अस्पृश्यता, शूद्र-अंत्यज यांची विपन्नावस्था, स्त्रियांची परवशता, वर्णानां गुरु जे ब्राह्मण त्यांची चारित्र्यहीनता, हें सर्व नाहीसे होणें अवश्य आहे, हें त्यांना बिलकुल मान्य नव्हतें. लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या पुरस्कर्त्याने हें मान्य करावयास हवें होतें, आणि त्यासाठी इतर विषयांचा जसा त्यांनी प्रपंच केला तसा यांचाहि करावयास हवा होता, पण तसें त्यांनी केलें नाही. उलट या दुष्ट रूढिविरुद्ध ज्यांनी मोहीम सुरू केली होती त्यांच्यावर ते सहानुभूतिशून्य टीका करीत राहिले. विष्णुशास्त्री यांनी त्यांच्या दोषांवर, त्यांच्या विसंगत वर्तनावर टीका करूनहि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यास वास्तविक हरकत नव्हती.
विचारसाम्य
एक गमतीची गोष्ट पाहा. लोकहितवादींची 'शतपत्रे' व विष्णुशास्त्री यांची 'निबंधमाला' हे दोन ग्रंथ जरा न्याहाळून पाहिले तर या दोन थोर विचारवंतांमध्ये किती तरी वैचारिक साम्य असल्याचे आढळते. विष्णुशास्त्री यांना अत्यंत प्रिय असलेले विचार, तत्त्वें, सिद्धान्त लोकहितवादी यांनी किती तरी पत्रांत सांगितले आहेत. असे असूनहि त्यांची दखल विष्णुशास्त्री यांनी घेतली नाही, यामुळे मन