४६ । केसरीची त्रिमूर्ति
पुस्तकें व ग्रंथ यांची आवश्यकता यासंबंधीच चर्चा आहे; आणि "मराठींत ग्रंथ लिहून आपल्या इंग्रेजी विद्वत्तेस बट्टा आणणें हें तर त्यांस अगदी आवडत नाही" अशी नव्या विद्वानांवर टीका केली आहे. 'इंग्रेजी भाषा' या निबंधांत, इंग्रजी ग्रंथांचें माहात्म्य सांगून, नाना प्रकारच्या विषयांवर हजारो ग्रंथ होऊन ते तिकडे सर्वांस समजूं लागल्याने एकंदर राष्ट्राचे ठायीं अभिज्ञता व ज्ञानाविषयी उत्कंठा अधिकच प्रबळ झाली, असा अभिप्राय मांडला आहे; व प्रसिद्ध इंग्रज लेखक मेकॉले याच्या ग्रंथकर्तृत्वाचा गौरव करून त्याच्या गुणदोषांची चिकित्सा केली आहे. डॉक्टर जॉनसन याच्या चरित्राचा समारोप करतांना, त्याच्या चरित्रावरून एतद्देशियांनी कोणता बोध घ्यावा हें सांगतांना, विष्णुशास्त्री यांनी मराठींत विविध विषयांवर ग्रंथरचना करावी, हाच उपदेश केला आहे; आणि या उद्योगापासून सध्याच्या काळीं धनलाभ होण्याचा संभव नसला तरी केवळ देशहितबुद्धीने हा उद्योग त्यांनी केला पाहिजे, असा आग्रह धरला आहे.
ग्रंथमाला
यावरून पाश्चात्त्य संस्कृतींतील मूलभूत तत्त्वांच्या बाबतींत तरी विष्णुशास्त्री दुराग्रही वा अंध नव्हते हें निश्चित म्हणतां येतें. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, विचार-स्वातंत्र्य, आणि या सर्वाला पायाभूत असणारें ज्ञान, भौतिकविद्या, त्या विषयावरील ग्रंथरचना या पाश्चात्त्य संस्कृतीच्या महत्त्वाच्या घटकांचा आपण स्वीकार केला पाहिजे, असें त्यांनी आग्रहाने सांगितलें आहे. त्या संस्कृतीचे त्यांच्यापुढे उभे असलेले प्रवक्ते म्हणजे जे इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज पंडित व मिशनरी यांच्याबद्दल त्यांना वाटणारा द्वेष त्यांनी विवेकी रसग्रहणाच्या आड येऊ दिला नाही. निबंधमाला बंद करण्याचे त्यांनी ठरविलें त्या वेळीं ग्रंथमाला सुरू करण्याचा त्यांचा संकल्प होता. या ग्रंथांत त्यांनी ग्रीस, रोम, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड यांच्या इतिहासाचेंच विवेचन केलें असतें असें वाटतें. कारण ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे युरोपांत जें महान्
परिवर्तन घडून आलें तें त्यांच्या डोळ्यासमोर नित्य असे, असें निबंधमालेवरून वाटतें. तें कसेंहि असो. पाश्चात्त्य संस्कृतीबरोबर जीं मूल्ये भारतांत आलीं त्यांचें त्यांनी मुक्त मनाने स्वागत केलें होतें यांत शंका नाही.
हे निश्चित केल्यानंतर आता प्राचीन भारतीय संस्कृति, येथला धर्म, येथली समाजरचना, येथल्या जुन्या परंपरा यांविषयी विष्णुशास्त्री यांचा दृष्टिकोन काय होता तें पाहावयाचें आहे.