Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजी विद्येचें वज्र । ४५

त्यांची अपूर्व विद्या आपल्या पायांनी चालत आली आहे. आणि विद्येचा संस्कार सामान्यतः वरील उन्नतीस कारणीभूत होतोच. त्यांतून ग्रीक, रोमन, इंग्लिश या विद्यांचा तर वरील प्रभाव स्पष्टच आहे." या प्रकारे त्या विद्येचा गौरव करून युरोप खंडांत ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे युरोपीय लोकांनी केवढी धार्मिक व राजकीय क्रांति केली त्याचें वर्णन मोठ्या तन्मयतेने विष्णुशास्त्री यांनी केलें आहे. आणि शेवटी तीच क्रांति त्याच शस्त्राने येथे आपण केली पाहिजे हें निःसंदिग्धपणें सांगितलें आहे. ते म्हणतात, "एकंदरीत हें सांगावयाचें की, सज्ञान दशेचें फळ देशोन्नति हे होय. यास्तव आमच्या देशांत जों जो इंग्रेजी विद्येचा प्रसार होत जाईल तों तो सुधारणा, स्वातंत्र्य, सुख यांचा प्रसार अवश्य होत जाणार. एक इंग्रजी विद्येचें वज्र आमच्या हातांत असलें, म्हणजे मग लिटनशाही, टेंपलशाही, चाटफील्डशाही, मूरशाही वगैरे शंभर शाह्यांस सुद्धा आम्ही दाद देणार नाही."
 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधाच्या अखेरीस पुन्हा असाच ज्ञानाच्या प्रसाराचा महिमा त्यांनी गायिला आहे. हिंदुस्थानचें नष्टचर्य संपविण्यास उत्तम उपाय, त्यांच्या मतें, एकच. लोकांना आत्मस्थितीचें पूर्ण ज्ञान करून देणें. आणि याचें स्पष्टीकरण देतांना आत्मस्थितीचें ज्ञान म्हणजे साऱ्या जगाच्या स्थितीचें ज्ञान, असा खुलासा केला आहे; आणि छापखाने, तारायंत्रें, आगगाड्या या दिव्य अस्त्रांच्या साहाय्याने, कुंभकर्णाप्रमाणे सुस्त होऊन पडलेल्या या देशाला हालहालवून जागे करण्याची तजवीज केली पाहिजे, असें सांगून रसना आणि लेखणी या दोन साधनांचा अवलंब करून हें कार्य साधावें, असा देशबांधवांना त्यांनी उपदेश केला आहे. पाश्चात्त्य विद्या, पाश्चात्त्य ज्ञान यांचा प्रसार हाच देशोन्नतीचा सर्वश्रेष्ठ उपाय होय, असा विष्णुशास्त्री यांचा अभंग विश्वास असल्यामुळेच, ग्रंथकार होणें, नाना विषयांवर ग्रंथ लिहिणें हें त्यांनी आपले ध्येय ठरविलें होतें; आणि निबंधमालेतून व 'केसरी'तून नव्या विद्वानांपुढे तुम्ही ग्रंथ लिहा, ग्रंथ लिहा, असा सारखा घोष चालविला होता.
ग्रंथ लिहा
 अगदी पहिल्याच निबंधांत मराठी भाषेची उपेक्षा केल्याबद्दल नव्या विद्वानांवर टीका करतांना शास्त्रीबुवा म्हणतात, सध्या इंग्रजी विद्येचा व भाषेचा जो फैलावा लोकांत होत आहे तो आम्हांस अनिष्ट तर वाटत नाहीच, उलट आपल्या मराठीच्या उत्कर्षालाच तो कारण होईल अशी आमची खात्री आहे; पण तसें व्हावयाचें तर इंग्रजींतील केवळ अर्थ मात्र घेऊन त्यास शुद्ध मराठीच्या साच्यांत ओतलें पाहिजे. मात्र इंग्रेजींतील ज्ञानभांडार मराठींत आणतांना आपल्या भाषेचें स्वत्व म्हणजे निराळेंपण कायम राखलें पाहिजे. अशा तऱ्हेचे ग्रंथ बनले असतांना ते भाषेस हितावह होऊन भूषणप्रद होतील." 'प्रस्तुत मालेचा उद्देश' या दुसऱ्या निबंधांतहि ज्ञानाचा प्रसार, पाश्चात्त्य विद्येचा फैलावा आणि त्यासाठी मासिक-