२८ । केसरीची त्रिमूर्ति
ब्राह्मणांवर तेव्हापासूनच सरकारची वक्रदृष्टि झाली होती. विष्णुशास्त्री यांना या वेळी प्रत्यक्ष शिक्षा झाली नाही; पण डायरेक्टर चॅटफील्डसाहेबांनी त्या वेळीं त्यांची रत्नागिरीस बदली करून, तुमच्या राजद्रोहाची सरकारने दखल घेतली आहे, याची जाणीव करून दिली होती. आणि ही जाणीव प्रथमपासूनच असल्यामुळे विष्णुशास्त्री यांनी नोकरीची रुपेरी बेडी तोडून टाकण्याचें तेव्हाच ठरवून टाकलें, आणि तेवढ्यावर भागले नाही तर तुरुंगांत जाण्याचीहि मनाची सिद्धता करून ठेवली. फ्रेंच राज्यक्रांतीचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. रूसो, व्हाल्टेअर यांच्या ग्रंथांचें मनन केलें होतें. त्यामुळे प्रस्थापित सत्तेविरुद्ध लोकांना चेतवणी द्यावयाची तर लेखकाला त्यासाठी कोणती किंमत द्यावी लागते, कोणते अनर्थ त्याच्यावर आदळतात, त्याच्या आयुष्यांत सुखाला अनवसर कसा असतो याची त्यांना पुरेपूर जाण होती. मनाची अशी सिद्धता करून जो लिहितो त्यालाच लोकांत चैतन्य निर्माण करतां येतें. नवयुगाचें प्रवर्तन तोच करूं शकतो. लोकजीवनाला चित्कळेचा स्पर्श तोच घडवू शकतो. हें आणिकांचें काम नाही.
हें आणिकांचें काम नाही हें कांग्रेसच्या स्थापनेच्या आधी सात-आठ वर्षे आणि नंतर आठ-दहा वर्षे या काळांत ज्या घडामोडी झाल्या त्यांवरून स्पष्ट होईल.
धैर्य नाही
१८७७ सालापासून दादाभाई, रानडे, तेलंग, मंडलीक, फेरोजशहा मेथा, सुब्रह्मण्य अय्यर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी या नेमस्त प्रागतिक पक्षाच्या नेत्यांच्या मनांत काँग्रेससारखी एखादी अखिल भारतीय सभा स्थापावी, असें येत होतें पण त्यांच्या हातून तें घडलें नाही. तें घडलें केव्हा, तर ह्युम, वेडरबर्न, कॉटन यांसारखे इंग्रज अधिकारी यांनी पुढाकार घेतला तेव्हा ! वरील नेत्यांच्या मनांत, या कार्याला अवश्य तो आत्मविश्वास नव्हता, धैर्य नव्हते, त्यांच्या हातून राष्ट्रसभेची स्थापना होणें अशक्य होतें, असें खुद्द ना. गोखले यांनीच म्हटलें आहे. कारण अत्यंत सौम्य असें का होईना, पण तिला राजकीय संघटनेचें रूप होतें. तेव्हा अशी संघटना निर्माण करून सरकारची नाराजी ओढवून घेण्याचे धैर्य त्यांपैकी कोणाच्याहि अंगीं नव्हतें. ह्यूम, वेडरबर्न, कॉटन यांना सरकारच्या नाराजीची भीति नव्हती. म्हणूनच पुढाकार घेऊन ते अशी सभा स्थापूं शकले. राष्ट्रसभेची चार-पांच अधिवेशनें झाल्याबरोबर सरकारची तिच्यावर वक्रदृष्टि झालीच. १८९० सालीं सरकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहूं नये असा हुकूम काढण्यांत आला आणि खेदाची गोष्ट अशी की, न्या. मू. रानडे व न्या. मू. तेलंग यांच्यासारख्यांनी तो मानला ! (आधुनिक भारत प्रकरण ६ वें).
क्षात्रधर्म
'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथांत आचार्य जावडेकर यांनी विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक यांनी सर्वस्व वाहून देशसेवा करणारा असा नवा पंथच स्थापिला,