-४-
एक पाय तुरुंगांत |
राजद्रोहाचा आरोप
विष्णुशास्त्री यांनी स्वभाषा, स्वधर्म आणि स्वदेश यांचा अभिमान जागृत करून या भूमींत नवें चैतन्य निर्माण केलें ; पण आपण हें ध्यानांत ठेवले पाहिजे की, स्वत्वाचें केवळ तात्त्विक विवेचन करून असें चैतन्य कधीच निर्माण झालें नसतें. ज्यांना ही स्वत्व-जागृति होऊं नये असें वाटत असतें, ज्यांची त्यामुळे मोठी हानि होण्याचा संभव असतो ते असले प्रयत्न ठेचून टाकण्यास सदैव सिद्ध असतात. तेव्हा ज्याला स्व-समाजाची अस्मिता जागृत करावयाची आहे त्याने हें भविष्य जाणूनच पावलें टाकणें अवश्य असतें. विष्णुशास्त्री यांना या भविष्याची पुरेपूर जाणीव होती
आणि मनाची तशी तयारी करूनच त्यांनी लेखणी उचलली होती. "तुम्ही इतके प्रखर, इतके कडक कसे लिहितां, सरकारवर, मिशनऱ्यांवर ही टीका कशी करता," असें कोणी त्यांना विचारले तेव्हा, 'एक पाय तुरुंगांत ठेवूनच मी लिहितों,' असें त्यांनी उत्तर दिलें होतें; आणि तुरुंगाची ही भीति केवळ काल्पनिक नव्हती. 'इंग्रजी भाषा' या विषयावरील तिसरा आणि मालेतील तिसावा निबंध प्रसिद्ध झाला त्या वेळी शास्त्रीबुवांच्यावर राजद्रोहाचा आरोप आलाच होता. त्या अंकांत भारताचा इतिहास लिहिणारे पाश्चात्त्य व विशेषतः इंग्रज इतिहासकार यांची बुद्धि कशी दुष्ट, पूर्वग्रहदूषित व पक्षपाती असते, त्यांचे लिखाण अयथार्थं व विपर्यस्त कसें असतें तें सांगून, त्यांच्यावर आणि अनुषंगाने येथील इंग्रज अधिकारी व मिशनरी यांच्यावर शास्त्रीबुवांनी झोंबरी टीका केली होती. ती सहन न होऊन मेजर जेकब यांनी 'एलिफास' या सहीने 'बॉम्बे गॅझेट'मध्ये पत्र लिहून, विष्णुशास्त्री व एकंदर पुण्याचे सर्व ब्राह्मण हे राजद्रोही आहेत, असा आरोप केला होता; आणि त्या तिसाव्या अंकाचें संपूर्ण भाषांतर करून ते सरकारकडे पाठवून दिलें होतें. पुण्याच्या